प्रदिप भाकरे, अमरावती : चांदूररेल्वे तालुक्यातील बासलापूर येथून ट्रॅक्टर ट्रॉली चोरून नेणाऱ्या चौघांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. आरोपींकडून चोरलेली ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यात आली. आरोपींनी ती ट्रॅक्टर ट्रॉली अवघ्या ४० हजार रुपयांत विकली होती. हे विशेष. अटक आरोपींमध्ये किशोर रामभाउ सदावर्ते (३९, रा. आरेगाव ता. मेहकर जि. बुलढाणा),अरुण बाबुराव पोहार (३५, रा. जालना), सचिन बजरंग ढोंगळे (३२, रा. झाकली ता. पन्हाळा, जि. कोल्हापुर) व मल्हार उर्फ जेसीबी. गंगाराम वाणी (३७, रा. हाता ता. सेनगाव जि. हिंगोली) यांचा समावेश आहे.
१७ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास बासलापूर येथील गजानन बोबडे यांच्या मालकीची ट्रॅक्टर ट्रॉली चोरीला गेली होती. चांदूररेल्वे पोलिसांनी १९ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला होता. स्थानिक गुन्हे शाखा त्या गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना ती ट्रॅक्टर ट्रॉली बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील मुख्य आरोपी गजानन मुळे याने साथीदारासह चोरी केल्याचे समजले.
कारने पोहोचले बासलापूरात:
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजानन मुळे याला ताब्यात घेवून विचारपुस केली असता आपण किशोर सदावर्ते, सचिन ढोंगळे व अन्य तिघांच्या सहाय्याने ती ट्रॅक्टर ट्रॉली चोरल्याची कबुली दिली. आपण किशोर सदावर्ते याच्या कारने बासलापुरात गेलो. ट्रॅक्टर ट्रॉली चोरी करून ती मल्हार उर्फ जेसीबी गंगाराम वाणी याच्या माध्यमातून जालण्याच्या अरूण पोहार याला ४० हजार रुपयांत विकल्याचे कबुल केले. त्याआधारे वरून मल्हार उर्फ जेसीबी व अरूण पोहार यांना अटक करून त्यांच्याकडून ट्रॅक्टर ट्रॉली व चारचाकी जप्त करण्यात आली. अन्य चार फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता:
अटक आरोपींकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता एलसीबीने व्यक्त केली आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी प्रमुख किरण वानखडे, यांच्या नेतृत्वात उपनिरिक्षक मोहम्मद तस्लीम व मुलचंद भांबुरकर, अंमलदार पुरुषोत्तम यादव, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे, मंगेश मानमोठे यांनी ही कारवाई केली.