लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : वाढती लोकसंख्या ही देशातील सर्वांत मोठी समस्या आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कुटुंब नियोजनाविषयीची जनजागृती केली जाते; परंतु जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला त्यात अपयश येत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात तीन महिन्यांमध्ये फक्त तीन पुरुषांच्याच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्या. सबब, वर्षभरातील एकूण पुरुष शस्त्रक्रियेच्या उद्दिष्टापैकी तीन महिन्यात केवळ ०.२८ टक्केच उद्दिष्ट आरोग्य विभागाला गाठता आले आहे. तर महिलांच्या देखील केवळ ६७० शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या असून ५.६२ टक्केच उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन झाला. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाख ८७ हजार ८२६ इतकी होती. गेल्या १३ वर्षांमध्ये ती लोकसंख्या ३२ लाखांपेक्षा जास्त असल्याचे बोलले जात आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्य, शिक्षण, निवारा यांसारख्या समस्याही निर्माण होत आहेत. त्यामुळे कुटुंब नियोजन ही काळाची आहे. त्यामुळे वर्षभरात स्त्री आणि पुरुषांच्या मिळून एकूण १२ हजार ९९७ कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सुरुवातीच्या तीन महिन्यांत केवळ ५.१८ टक्केच उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
ग्रामीण भागात एकही शस्त्रक्रिया नाहीएप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकही शस्त्रक्रिया झालेली नाही. ग्रामीण भागात ८८५ पुरुष शस्त्रक्रिया तर ९ हजार ७२० महिला असे एकूण १० हजार ६०५ शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट आहे.
शहरात ६७३ शस्त्रक्रियातीन महिन्यांमध्ये झालेल्या ६७३ कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया या शहरी भागातील आहेत. शहरात पुरुष शस्त्रक्रियेचे १९६ इतके उद्दिष्ट असून त्यातील ३ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तर २१९६ महिलांचे उद्दिष्ट असून ६७० महिलांच्या शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यात.
पुरुष नसबंदीविषयी अनेक गैरसमजनसबंदी शस्त्रक्रिया केली तर आपले पुरुषत्व जाईल, अशी भीती पुरुषांना वाटते. शस्त्रक्रियेमुळे तो अशक्त होईल, असा गैरसमज पुरुषांमध्ये असल्याने या शस्त्रक्रियेसाठी आजही पुरुषांची संख्या कमी आहे.