गाव विकास योजनेची हवी माहिती
५५२ ग्रामपंचायतींचे पदाधिकारी उपेक्षित, प्रशिक्षण नसल्याने ग्रामसेवक करतात दिशाभूल
मोहन राऊत
धामणगाव रेल्वे : आगामी पाच वर्षांत गावात केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी प्रशासनाच्या मदतीसोबतच जिल्ह्यातील ५५२ सरपंच, उपसरपंच यांना प्रशिक्षणाची गरज व्यक्त होत आहे. प्रशिक्षण नसल्याने ग्रामसेवक दिशाभूल करू शकतात, अशी भीती आहे.
पंचायत राजमधील सर्वात महत्त्वाच्या टप्पा असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या मदतीने मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ च्या कलम ५ अन्वये गावाचा कारभार चालतो. ग्रामपंचायतीचा वार्षिक आराखडा तयार करण्याचे अधिकार सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना आहेत.
गतवर्षी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच, उपसरपंच निवडून आले आहेत. नवखे असल्याने लोककल्याणकारी योजना राबविताना त्यांच्यापुढे अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. कोणत्या योजना कशा आहेत, किती खाते असतात, मासिक सभेमध्ये कोणते विषय घ्यावे, याचा अभ्यास नाही. सरपंच, उपसरपंच गोंधळात पडले आहेत. पंचायत राज व्यवस्थेनुसार या सरपंच, उपसरपंचांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाल्याने विस्तार अधिकारी तथा मास्टर ट्रेनर यांनी किमान मोठ्या ग्रामपंचायतींच्या गावांत जाऊन सरपंचांना प्रशिक्षण दिले द्यावे, अशी मागणी होत आहे.
२९ बाबींचे हवे प्रशिक्षण
गावात रस्ते बांधणे, रस्त्यांची दुरुस्ती, दिवाबत्तीची सोय, जन्म, मृत्यू व विवाह नोंदी, सार्वजनिक स्वच्छता, सांडपाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, शिक्षण, आरोग्यविषयक सोयी, शेती विकासाच्या व पशुधन सुधारणेच्या योजना अंमलात आणणे, गावाचा बाजार, जत्रा, उत्सव, यांची व्यवस्था ठेवणे या २९ बाबी गावात ग्रामसेवक राबवित असतात. त्यांच्या कामाकडे लक्ष ठेवणे व प्रसंगी मदत सरपंच, उपसरपंचांनी करणे गरजेचे आहे.
--------------------
आम्ही पदावर येऊन आठ महिन्यांचा कालावधी लोटला. कोरोनामुळे आम्हाला प्रशिक्षण मिळाले नाही. प्रशिक्षण दिल्यास गावच्या विकासात आमचा हातभार लागू शकतो.
- संदीप इंगळे, उपसरपंच, कावली
सरपंच, उपसरपंच, ग्रामसचिव यांच्या समन्वयाने ग्रामपंचायतचा कारभार चालतो. आम्हा नवीन लोकांना प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. आता तरी प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत प्रशिक्षण द्यावे.
- ममता मुकेश राठी, सरपंच, गव्हा फरकाडे