अमरावती : जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या जिल्हा पथकातील ऑडिटरद्वारा अधिकाराच्या कक्षेबाहेरील माहिती मागत आहे. रुग्णांना औषधी कोणती द्यावी, याबाबत पथक सांगत आहे. यासह अन्य बाबींचा भंडाफोड कोविड हॉस्पिटलच्या संचालक डॉक्टरांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांसमोर केला. ऑडिटर पथकांद्वारा नोटीस बजावलेल्या खासगी कोविड रुग्णालयांच्या संचालकांसह ‘आयएमए’च्या पदाधिकाऱ्यांशी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी बैठकीद्वारे संवाद साधला.
यावेळी डॉक्टरांनी त्यांच्या पुढ्यात व्यथा मांडल्या. पथकाद्वारा बजावण्यात आलेल्या नोटीसमध्ये ज्या बाबीवर आक्षेप आहे. त्याविषयीचे स्पष्टीकरण डॉक्टरांनी द्यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याचे श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. अनिल रोहणकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ऑडिट हे फायनॉशिअल असले पाहिजे. मात्र, पथकाद्वारा ड्रग ऑडिट केले जात आहे. रुग्णांना कोणती औषधी द्यायची, ही बाब डॉक्टरांना ठरवू द्या, यात ऑडिटरची लुडबूड नको, असे आयएमएचे अध्यक्ष डाॅ. दिनेश ठाकरे म्हणाले. या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पथकाशी संवाद साधल्याची माहिती आहे.