अमरावती : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विदर्भस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना मंगळवारी (2 ऑक्टोबर) नागपूर वर्सेस चिखलदरा यांच्यात रंगला. यामध्ये चिखलदरा संघाने बाजी मारत चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरले. यात नागपूर संघ उपविजेता ठरला. ज्ञानज्योती अंध विद्यालय नागपूर संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. अंध विद्यालय चिखलदारा संघाने उत्कृष्ट फलंदाजी करीत १० षटकांत ९२ धावसंख्या उभारली.
९२ धावांचे लक्ष्य पूर्ण करताना नागपूर संघाला ६ गडी गमावून ६३ धावांवरच समाधान मानावे लागले. त्यामुळे चिखलदरा संघाने नागपूर संघावर एकतर्फी मात देऊन विजश्री खेचली. विद्यार्थ्यांनी अंतिम सामना जिंकल्यानंतर एकच जल्लोष केला. क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लार्इंड आॅफ महाराष्ट्र ही संस्था क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लार्इंड इन इंडिया व वर्ल्ड ब्लार्इंड क्रिकेट असोसिएशन या संस्थांशी संलग्न असून या संस्थेच्यावतीने अमरावती येथील हनुमान व्यायाम शिक्षण प्रसारक मंडळातील मैदानावर दोन दिवसीय शालेय स्तरावरील अंध (दृष्टीहीन) मुलांच्या विदर्भ विभागातील विद्यार्थ्यांच्या क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते. यावेळी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या हस्ते विजयी संघाला ट्रॉपीने गौरविण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ समाजसेवक गोविंद कासट, क्रिकेट असोसिएशन फॉर दी ब्लार्इंड आॅफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवि वाघ, प्रोजेक्ट मॅनेजर पंकती लालाजी, दादाभाई कुटे, शाकीर बशीर नायक, पंकज चौधरी, रमाकांत साटम आदी उपस्थित होते.