लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दीड वर्षांपासून कोरोना ठाण मांडून आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर त्याचा कहर ओसरला असून निर्बंध शिथिल झाले आहेत. यामुळे आर्थिक उलाढाल पूर्वपदावर येत आहे. परिणामी दोन वर्षांनंतर यंदाच्या दिवाळीत बाजारपेठेत कमालीचा उत्साह आहे. जेमतेम पाच दिवसांवर आलेल्या या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुकाने, आस्थापनांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. दिवाळी हा आनंद, मांगल्याचा सण. गरीब असो वा श्रीमंत, आपल्या परीने हा सण साजरा करतोच. कोरोनातून सावरत असताना अनेकांची आर्थिक बाजू जेमतेम आहे. तरीही बाजारपेठेत दिवाळीसाठी होत असलेली गर्दी ‘आली दिवाळी - ती साजरी करू या’ असा अनुभव येत आहे. कोरोना असला तरी त्याच्यासमवेत जगावे लागेल. त्यामुळेच गत १५ दिवसांपासून बाजारपेठेत विविध साहित्य, वस्तू खरेदीसाठीची लगबग सुरू झाली आहे. नोकरदार वर्गाच्या हाती दिवाळी बोनस आल्याने शहरातील मुख्य बाजारपेठेत गर्दी वाढली आहे.
आकाशदिवे, पणत्यांनी दुकाने सजलीदिवाळीसाठी आकाशदिवे, मेणाच्या व मातीच्या पणत्यांनी सजलेली दुकाने लक्ष वेधून घेत आहेत. दिल्ली, मुंबई, अहमदाबाद येथे तयार केलेले साहित्य विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाले.
तयार वस्त्रांना पसंतीयंदा दिवाळीत तयार वस्त्रांना पसंती दिली जात आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच निर्बंध हटल्यानंतर दिवाळी सण आल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कर्मचारी बोनसमुळे आनंदी आहेत.
डिपार्टमेंटलकडे कलकापड दुकानांमध्ये गर्दी वाढली आहे. दुकानदारांनी दिवाळीच्या व्यवसायासाठी कोरोनाकाळात धुळीने माखलेली दुकाने स्वच्छ केली. एकल दुकानांऐवजी डिपार्टमेंटल स्टोअरमधून कपड्यांशिवाय अन्य वस्तू खरेदी करण्याचा आनंद अमरावतीकर घेत आहेत. तथापि, नावाजलेली एकल दुकानेही कोरोनाकाळात बुडालेला व्यवसाय करीत आहेत.
शेतकरी वर्ग बाजारातून गायब नोकरदार वर्गाच्या हाती वेतन, बोनसची रक्कम आहे. मात्र, शेतकरी निसर्गाच्या संकटातून अद्यापही सावरला नाही. बाजार समितीत भाव पाडून सोयाबीनची खरेदी केली जात आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी सजलेल्या बाजारात शेतकरी कुठेही नाही, असे वास्तव आहे.
- यंदा चायना फटाके बाजारात विक्रीसाठी आणले जाणार नाहीत, असा निर्णय फटाके विक्रेत्यांनी घेतला आहे. चायना फटाके हे आरोग्यासाठी घातक ठरतात, अशी काही अंशी खरी ठरणारी भीती त्यामागे आहे.