टाकरखेडा संभू : कोरोनाच्या प्रादुर्भाव सद्यस्थितीत नियंत्रणात असल्याने सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. परंतु, अद्यापही बससेवा सुरू न केल्याने नागरिकांचे हाल होत आहेत, तर खासगी वाहनचालकांची दिवाळी साजरी होत आहे. असाच प्रकार भातकुली तालुक्यातील टाकरखेडा संभू येथे होत असून, येथे त्वरित बस सुरू करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
टाकरखेड्यातील बससेवा आठ ते दहा महिन्यांपासून बंद आहे. ठप्प असलेले बहुतांश व्यवहार सुरळीत झाल्याने नागरिकांची ये-जा आता वाढली आहे. पाच ते सहा हजारांवर लोकसंख्या असलेल्या टाकरखेडा संभू येथून खाजगी कामांकरिता अमरावती व इतर ठिकाणी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. परंतु, गावात बससेवा बंद असल्याने प्रवाशांना खासगी वाहनांमध्ये जादा पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे याची दखल घेऊन तात्काळ बससेवा पूर्ववत करावी, अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे.
--------------