मनोज मानवतकर।आॅनलाईन लोकमतनांदगाव खंडेश्वर : गरीब रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णालय आजारातून मुक्ती मिळविण्यासाठी आशेचा किरण असतो. परंतु नांदगाव येथे आरोग्य यंत्रणेचाच बोजवारा उडाला असल्याने रुग्णांना मरणयातना सहन करण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. शहरातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर नाही, औषध नाही. वॉर्डात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. ही स्थिती तातडीने सुधारावी, या रुग्णांच्या मागणीकडे प्रशासनातील कुणीच अद्याप लक्ष दिले नाही.नांदगाव शहराची लोकसंख्या १५ हजारांवर आहे, तर ग्रामीण रुग्णालयात शहरासह तालुक्यातील दररोज २५० ते ३०० रुग्णांची ओ.पी.डी. होते. रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाने एम.बी.बी.एस. डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. परंतु, सद्यस्थितीत याठिकाणी डॉक्टरच उपलब्ध नसल्याने रुग्णालयाचा कारभार राष्टÑीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत तपासणी पथकातील शिकाऊ डॉक्टरांद्वारे चालविला जात असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास येत आहे. या ठिकाणी औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. टायफॉइडच्या रुग्ण, मधुमेह व रक्तदाबाच्या रुग्णांकरिता औषध नाही. एवढेच नव्हे तर खोकल्याचे औषध नाही. लहान मुलांवर औषधोपचाराचीही येथे सुविधा नाही. खाज व लहान-सहान दुखण्यांसाठी क्रीम उपलब्ध नाही. रुग्णांकरिता ग्रामीण रुग्णालयात पाण्याची सुद्धा कमतरता आहे.रुग्णालय परिसरात तसेच रुग्णांच्या वॉर्डात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रुग्ण कक्षातील संडास, बाथरूमची दयनीय अवस्थ झाली आहे. सगळीकडे घाण पसरल्याने ग्रामीण रुग्णालयच आजारी पडल्याचे दिसून येत आहे. ज्या रुग्णांची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक आहे, ज्यांना खासगी दवाखान्यात उपचार घेणे आवाक्याबाहेरचे आहे, अशा गरीब रुग्णांना जर ग्रामीण रुग्णालयात पुरेशी आरोग्य सेवा मिळत नसेल, तर त्यांनी कुढत मरण जवळ करावे का, असा प्रश्न लोकमानसात विचारला जात आहे.पोस्टमार्टम अमरावतीलाग्रामीण रुग्णालयात समस्या वाढतीच आहे. येथे रुग्णांसाठी आॅक्सीजनची व्यवस्था नाही. पोस्टमार्टमसाठी अमरावतीला जावे लागते. त्यासाठी अॅम्ब्यूलन्सदेखील उपलब्ध नाही. रुग्णसेवेकरिता तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता तर आहेच, कर्मचारीदेखील पुरेशा संख्येने नसल्याने रुग्णांची आबाळ होते.मोखड येथील अस्थमा (दमा) च्या रुग्ण कांताबाई नानाजी पवार यांना ग्रामीण रुग्णालयात भरती केले. आॅक्सीजनअभावी तीन तास ताटकळत ठेवले. अखेर त्यांची स्थिती नाजूक झाल्याने औषधोपचारासाठी अमरावतीला न्यावे लागले.- दुर्गेश सोळंके,मोखड.