धामणगाव रेल्वे : राज्यात येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांसह अन्य निवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना सहा जिल्ह्यात होत असलेल्या निवडणुकादेखील रद्द करून निर्णय होईपर्यंत त्या घेऊ नये, अशा आशयाचे निवेदन बुधवारी भाजपतर्फे तहसीलदारांमार्फत राज्यपालांना पाठविण्यात आले.
राज्यात धुळे, नंदूरबार, अकोला, वाशिम व नागपूर येथील निवडणुका शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारमुळे जाहीर झाल्या. जर या आघाडी सरकारने वेळीच इंपेरिकल डेटा कोर्टाला दिला असता, तर ओबीसी बांधवांवर निवडणुकीतून हद्दपार व्हायची वेळ आली नसती. तथापि, जोपर्यंत राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक घेण्यात येऊ नये, असे निवेदन भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सुनील साकोरे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिरपूरकर, सरचिटणीस नितीन मेंडुले, शहराध्यक्ष गिरीश भुतडा, तालुका उपाध्यक्ष योगेश अंभोरे, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस अनुराग मुडे, उल्हास कांबळे, गणेश येलेकर, महेंद्रसिंह ठाकूर, अनुराग मुडे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरीनिशी देण्यात आले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.