राणी बंग : महिला सक्षमीकरण कार्यशाळाअमरावती : दिसणं महत्त्वाचं आहे की असणं, हे समजून घेऊन स्त्रियांनी अंतरंगाने, व्यक्तिमत्त्वाने आणि स्वभावाने सुंदर बनण्याचा प्रयत्न करावा. केवळ लौकिक सौंदर्याच्या मृगजळामागे धावू नये, असे आवाहन गडचिरोली येथील सामाजिक कार्यकर्त्या राणी बंग यांनी केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात रासेयोच्यावतीने बुधवारी आयोेजित द्वि-दिवसीय महिला सक्षमीकरण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी कुलगुरू मुरलीधर चांदेकर, कुलसचिव अजय देशमुख, बीसीयूडीचे संचालक राजेश जयपूकर, युवा उद्योजिका नेहा खरे, कला विद्या शाखेचे अधिष्ठाता मनोज तायडे, मोना चिमोटे, हेमंत खडके व विद्यार्थी कल्याण संचालक गणेश मालटे उपस्थित होते. राणी बंग पुढे म्हणाल्या, ‘सुंदर मी होणार’ या कार्यशाळेचे आयोजन कुलगुरूंनी मुलींसाठी केले, हे खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल होय. शिक्षणाचे महत्त्व विशद करताना त्या म्हणाल्या, उत्कृष्ट माणूस घडविण्यासाठी शिक्षणाचा उपयोग व्हायला हवा. शिक्षण हे केवळ पैसे कमविण्याचे साधन नव्हे तर मी माझ्यासाठी काय करू शकते, याचा विचार त्यातून व्हायला हवा. शिक्षणपद्धती प्रॅक्टिकल असावी, असे सांगून मुलींनी हिम्मत दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना राणी बंग यांनी समर्पक उत्तरे दिली. पाहुण्यांचे स्वागत विद्यार्थी कल्याण संचालक गणेश मालटे यांनी केले. संचालन मराठी विभागातील मोना चिमोटे, तर आभार हेमंत खडके यांनी मानले. कार्यक्रमाला शोभा रोकडे, वर्षा नाठार, राजेश पिदडी व विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सौंदर्याच्या मृगजळामागे धावू नका !
By admin | Published: January 24, 2017 12:24 AM