शेतकऱ्यांची मागणी : कृषिमंत्र्यांचे विधान चुकीचेच चांदूरबाजार : शासनाने तूर खरेदी केंद्र बंद करून शेतकऱ्यांची निराशा केली आहे. शेतकऱ्यांची तूर मोठ्या संख्येने बाजारपेठेत मोजणी अभावी पडून आहे. तर त्याहून अधिक तूर शेतकऱ्यांच्या घरात साठवून ठेवली आहे. ही सर्व तूर शासनाने हमी भावाने खरेदी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. चांदूर बाजार बाजार समितीमध्ये १२९० शेतकऱ्यांची २९ हजार ४८९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली तर बाजार समितीमध्ये मोजणी अभावी २५ हजार पोते तूर तशीच पडून आहे. आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन केल्यावर मोजणी सुरू करण्यात आली आहे. मात्र जोपर्यंत शेकऱ्यांच्या घरात असलेली तूर पूर्णत: खरेदी केली जात तो पर्यंत तूर खरेदी सुरू ठेवावी अशी मागणी बाजार समितीमध्ये असलेले शेतकरी करीत आहेत. वारंवार तूर खरेदी केंद्र बंद राहिल्याने शेतकऱ्यांना तूरविक्रीसाठी महिनाभर रांगेत ताटकळावे लागले. परिणामी अनेक खरेदी केंद्रांच्या बाहेर तुरीने भरलेल्या वाहनांच्या रांगा आजही मोजमापाच्या प्रतीक्षेत दिसून येतात. त्यामुळे हजार मेट्रिक टन तूर सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या घरात व खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी पडून आहे. अशा परिस्थितीत राज्याचे कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी खरेदी केंद्रावर पडून असलेली तूर ही व्यापाऱ्यांची असल्याचा थेट आरोप केला आहे. त्यांचा आरोप शेतकऱ्यांना मान्य नाही. बाजार समितीमधील वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. शासकीय तूर खरेदी बंद झाल्याची बातमी कळताच तूर उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आहेत. आ. कडू यांनी तर तूर खरेदीसाठी शासन व प्रशासनलाच कोंडीत पकडले आहे. यामुळे धास्ती घेऊन चांदूर बाजार समितीमध्ये तूर खरेदी सुरू झाली.मात्र कृषीमंत्र्यांनी केलेल्या विधानामुळे शेतकरी आंदोलनाचा पावित्रा घेऊ शकतात. तूर खरेदीसाठी मुदत नको अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बाजार समित्यांमध्ये शेतकरी आपल्या मालाची मोजणी कधी होणार असा प्रश्न करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शासनाने तूर खरेदी करण्याची गरज निर्माण झाली आहे. आमची तूर अजुनही तशीच पडून आहे. तूर खरेदी झाली नाही तर आंदोलनाचा पावित्रा घेऊ.-बबलू देशमुख, शेतकरी बेलोराआ. बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर तूर खरेदी सुरू करण्याचे आदेश मिळाले आहेत. बाजार समितीमध्ये पडून असलेला सर्व २३ हजार क्विंटल माल खरेदी करणार आहोत. -विनोद जवजाळ. संचालक, बाजार समिती
तूर खरेदीसाठी ठराविक मुदत ठेऊ नका
By admin | Published: April 27, 2017 12:16 AM