लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात ४३ वॉर्डांमध्ये स्वच्छता कंत्राटदार असताना माझे शहर अस्वच्छ कसे? कंटेनरच्या बाहेर कचरा कसा? शहरातील नागरिक आजारी पडत असताना तुमची काहीच जबाबदारी नाही काय? आदी प्रश्नांची सरबत्ती करीत पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बुधवारी महापालिका आयुक्तांना खडे बोल सुनावले. अस्वच्छतेमुळे नागरिकांचा जीव जात असताना कारवाई केव्हा करणार, तुम्ही संबंधितांचे निलंबन करता की मी करू, असा निर्वाणीचा इशारा पालकमंत्र्यांनी आयुक्तांना दिला.शहरात डेंग्यू, स्वाइन फ्लू, स्क्रब टायफसच्या वाढता प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी बुधवारी मुंबईवरून घरी न जाता, शहराच्या सर्व भागांत फिरून शहरात पाहणी केली व त्वरित महापालिकेच्या आरोग्य विभागाची आढावा बैठक बोलावली. सुरुवातीला महापालिकेच्या आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांनी केल्या जात असलेल्या उपाययोजना ना. पोटे यांनी शांतपणे ऐकून घेतल्या. मात्र, त्यात अतिरेक होत असल्याचे निर्दशनास येताच पालकमंत्र्यांनी त्यांना मध्येच थांबविले आणि तोंडाला पाने पुसणे बंद करा, असे सुनावले. शहरात कोणत्या भागात कोणते अधिकारी जातात, याची विचारणा करीत संबंधित कर्मचाऱ्यांजवळूून ग्राऊंड रिपोर्ट घेतला. त्या भागातील किती नगरसेवकांना सोबत घेऊन किंवा माहिती देऊन गृहभेटी दिल्या जातात, याचा लेखाजोखा घेऊन प्रत्येक नगरसेवकाकडे वैयक्तिक पडताळणी करणार असल्याचे त्यांनी खडसावून सांगितले. वैद्यकीय अधिकाºयांनी प्रभाग, झोनमध्ये दिलेल्या गृहभेटी, तिथे केलेली फवारणी, किती वेळा करण्यात आली याचे रेकार्ड, गृहभेटी दिल्यानंतर आजाराचे रीपीटेशन झाले काय याबाबतचा लेखाजोखा घेतला. डेंग्यूसोबत शहरात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्यावाढ होत असल्याने तात्काळ शहरातील सर्वच डॉक्टरांशी आजच संपर्क करण्याच्या सूचना सीमा नैताम यांना दिल्यात.शहरातील किती रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण आहेत, याची माहिती पालकमंत्र्यांनी विचारली असता, नैताम यांनी यादगीरे, बोंडे, क्रिटिकल या रुग्णालयांची नावे सांगितली. यावर ही पालकमंत्र्यांची बैठक आहे; महापालिकेमधली आमदारांची बैठक नाही. तोंडाला पाने पुसण्याचे प्रकार करू नका, असे सुनावले. डॉ. बख्तार यांच्याकडे स्वाइन फ्लूचे तीन रुग्ण दाखल आहेत. शहरातील सर्व रूग्णालयांमध्ये संपर्क साधा, रिपोर्टिंग करा, रोज याविषयीचा अहवाल मला सायंकाळी ५ वाजता मिळाला पाहिजे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी के.पी. परदेशी, महापालिका आयुक्त संजय निपाणे, उपमहापौर संध्या टिकले, स्थायी सभापती विवेक कलोती यांच्यासह महापालिका गटनेते, विरोधी पक्षनेते, सभापती व सदस्य उपस्थित होते.तुम्हाला जेवायला बोलाविले काय? पालकमंत्र्यांनी सीमा नैताम यांना सुनावलेशहरात कंटेनर किती, असा सवाल पालकमंत्र्यांनी केला. नवे व जुने असे २५० कंटेनर आल्याचे सीमा नैताम यांनी सांगितले. कंटेनरच्या बाजूला कचरा पडल्यास उचलण्याची जबाबदारी कोणाची, असा प्रतिप्रश्न ना. पोटे यांनी केला. १०० फुटांपर्यंत कंत्राटदारांची जबाबदारी आहे; कंटेनरमधूून कचरा बाहेर पडल्यास कारवाई केली जाते, असे त्या म्हणाल्या. किती कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई केली याचे रेकॉर्ड सोबत नसल्याचे सांगताच, तुम्हाला काय जेवायला बोलाविले काय, अशा खरमरीत शब्दांत पालकमंत्र्यानी नैतामांना सुनावले.कंटेनरमध्ये कचरा आढळल्यास करा निलंबित२५ कोटींचे स्वच्छता कंत्राट असताना शहरात कचरा कसा, असा सवाल पालकमंत्र्यांनी केला. आजपासून सर्व कंटेनर स्वच्छ राहिले पाहिजे. कंटेनरमध्ये कचरा आढळल्यास सर्व संबंधितांना निलंबित करा, त्यांची चौकशी करून तक्रार एसीबीकडेदेखील करा; ‘दूध का दूध...’ होऊ द्या. ४३ कंत्राटदार असताना कचरा खपवून घेणार नाही. त्यांच्यावर कारवाई करा; कोणी आडवे आल्यास मला सांगा. माझ्या हाती बांगड्या नाही हे लक्षात ठेवा, असे पालकमंत्र्यांनी सुनावले.याद राखा कंटेनरच्या आत उतरवेन४३ कंत्राटदारांकडे २६ कर्मचारी अशी एकूण १,११८ माणसे असताना कंटेनर तुंबतातच कसे? कंटेनरच्या बाहेर कचरा पडतो कसा? कंत्राटदारांचे चोचले कोण पुरवितो? अशी प्रश्नांची सरबत्ती पालकमंत्र्यांनी केली. दंडात्मक कारवाईचे रेकॉर्ड उपलब्ध नाही; येथे गावजेवण आहे काय? आजपासून कंटेनरच्या बाजूला कचरा दिसल्यास त्या अधिकाºयाला आत उतरवेन. मी येथेच राहतो. मला सर्व प्रकार माहीत आहे. अधिक शिकवू नका, अशी तंबी पालकमंत्र्यांनी दिली.कंटेनर संख्येवरून अधिकाऱ्यांची पोलखोलशहरात २५० कंटेनरद्वारे कचरा गोळा केला जातो, अशी माहिती सीमा नैताम यांनी देताच पालकमंत्री चांगलेच उखडले. शहरात १४३ च्या वर एकही कंटेनर नाही. कंटेनर उचलला जातो अन् तोच आणून ठेवला जातो. माझी सफाई कंत्राटामध्ये भागिदारी नाही. कमिशनसाठी हे प्रकार काही चांगले लक्षण नाही. शहरात १४३ वर कंटेनर असल्यास मी राजीनामा देईन. आयुक्तांनी हा राजीनामा थेट मुख्यमंत्र्याकडे द्यावा, अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी सुनावले. २५० कंटेनर तुम्ही मोजलेत काय, अशी विचारणा नैताम यांना करीत त्यांनी प्रकरणाची पोलखोल केली.
निलंबन तुम्ही करता की मी करू?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 10:22 PM
शहरात ४३ वॉर्डांमध्ये स्वच्छता कंत्राटदार असताना माझे शहर अस्वच्छ कसे? कंटेनरच्या बाहेर कचरा कसा? शहरातील नागरिक आजारी पडत असताना तुमची काहीच जबाबदारी नाही काय? आदी प्रश्नांची सरबत्ती करीत पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बुधवारी महापालिका आयुक्तांना खडे बोल सुनावले.
ठळक मुद्दे‘डेंग्यू’वरून पालकमंत्री संतापले : अस्वच्छतेनेच शहर आजारी; महापालिका आयुक्तांना तंबी