(असाईनमेंट)
अमरावती : जिल्ह्यात मागच्या हंगामात परतीच्या पावसाने सोयाबीन हातचे गेले. कपाशीचे बोंडसडमुळे नुकसान झाले व पैसेवारी ४६ असल्याने दुष्काळस्थिती असल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केले. अशा प्रतिकूल परिस्थितीत फक्त २६ टक्के शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण देण्यात आले. त्यामुळे केवळ कंपन्यांचीच दुकाने भरण्यासाठीच पीक विमा काढायचा का, अशा शेतकऱ्यांचा सवाल आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा १२,४९० शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्यास नकार दिला आहे.
जिल्ह्यात मागच्या खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेत १,८५,६०१ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. शेतकरी हिस्सा तसेच केंद्र व राज्य शासनाचा हप्ता मिळून ४०० कोटींवर रक्कम कंपनीकडे जमा झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. सोयाबीन व कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना विमा भरपाई फक्त ६२.६३ कोटींची देण्यात आली आहे. ७४ टक्के शेतकऱ्यांना विमा मिळालेला नसल्याने फक्त कंपनीच्याच फायद्यासाठी पीक विमा असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. सोयाबीन व कपाशीचे संततधार पावसाने नुकसान झाल्यामुळे याच पिकांसाठी राज्य शासनाने एसडीआरएफच्या निकषाचे बाहेर जाऊन शेतकऱ्यांना ३०० कोटींची मदत दिली होती, हे येथे उल्लेखनीय.
आठवड्यात कृषिमंत्र्यांच्या जिल्हा दौऱ्यात कंपनीद्वारे शेतकऱ्यांची तक्रारींची दखल न घेण्याचा मुद्दा गाजला. त्यामुळे मंत्र्यांनी फैलावर घेतल्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी इफ्को-टोकियो या विमा कंपनीविरुद्ध गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
बॉक्स
३९ टक्के शेतकऱ्यांचा यंदा पीक विमा
१) जिल्ह्यात ४.१५ लाख शेतकरी संख्या आहे. यापैकी १,६१,९०६ शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभाग नोंदविला. हे प्रमाण ३९ टक्के आहे.
२) कंपनीद्वारा नुकसानभरपाई ठरविण्याचे सूत्र कंपनीधार्जिणे असल्यामुळे यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत १२,४९० शेतकऱ्यांनी पीक विम्यात सहभाग नोंदविलेला नाही.
३) गतवर्षी पिकांची प्रतिकूल परिस्थिती असतानाही फक्त २६ टक्के शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
पाईंटर
जिल्ह्यातील एकूण शेतकरी : ४,१५,२७०
पीक विम्यात सहभागी शेतकरी
यावर्षी : १,६१,९०६, गतवर्षी : १,८५,६०१
-----------
खरिपाचे एकूण क्षेत्र : ६,८८,७६०
कपाशी : २,२४,७१०
सोयाबीन : २,५३,६३०
तूर : १,१९,२७९
मूग : १६,४१७
उडीद : ५,९४५
ज्वारी : १४,३६०
---------
कोट
पीक विम्यात सहभागी शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याचे ७२ तासांच्या आत कंपनीला माहिती द्यावी. संपर्कात अडचणी येत असतील, तर कृषी किंवा तहसील कार्यालयास याची माहिती द्यावी.
- विजय चवाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
कोट
गतवर्षीचा अनुभव वाईट
गतवर्षी सोयाबीन पिकाचा विमा काढला होता. परतीच्या पावसाने पूर्ण सोयाबीन सडले. विमा कंपनीला याची माहिती दिली. त्यांनी पाहणी केली. मात्र, भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे यंदा पीक विमा काढलेला नाही.
- सूरज देशमुख, शेतकरी
गतवर्षी कपाशी आणि सोयाबीनचा विमा काढला होता. ऑगस्टपासूनच्या पावसाने दोन्ही पिके हातची गेली. त्यामुळे शासनाची मदत मिळाली, विमा कंपनी म्हणते, या भागात उंबरठा उत्पन्न जास्त आहे.
- अरविंद वानखडे, शेतकरी