उज्वल भालेकर
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे मागील दोन महिन्यांपासून मनोरुग्णांसाठी आवश्यक असलेल्या औषधसाठांचा तुटवडा निर्माण झाल्याने मनोरुग्ण औषधांपासून वंचित आहे. रुग्णालयातील मनोरुग्ण बाह्यरुग्ण विभागात रोज ५० ते ६० रुग्ण तपासणीसाठी येतात. परंतु, या ठिकाणी ७० टक्के आवश्यक औषधांचा तुडवडा असल्याने, अनेकांना औषधांशिवाय परतावे लागत असल्याचे चित्र सध्या रुग्णालयात पाहायला मिळत आहे.
दररोजच्या ताणतणावांमुळे मनोरुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. या रुग्णांवर तातडीने औषधोपचार केल्यास त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता येऊ शकते. परंतु, सरकारच्या अनास्थेमुळे शासकीय रुग्णालयांची अवस्था बिकट झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील दोन महिन्यांपासून मानसिक आजारासंबंधीच्या औषधांचा तुटवडा आहे. यात लोराझेपाम, डाईझेपाम व क्लोनाझेपाम या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक मनोरुग्णांना औषधांशिवाय परतावे लागत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मनोरुग्णांवर उपचार होणार कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय येथील बाह्यरुग्ण ओपीडीमध्ये रोज ५० ते ६० रुग्ण येतात. यातील बहुसंख्य रुग्णांवर पाच ते सहा महिने तर काहींवर त्यापेक्षाही जास्त कालावधीसाठी उपचार करावे लागतात. त्यामुळे गरीब कुटुंबातील मनोरुग्णांसाठी शासकीय रुग्णालय हेच आशेचा किरण आहे. परंतु, रुग्णालयातील औषधांचा तुटवडा, अपुरा निधी, डॉक्टरांची कमतरता, पर्यायी उपचारांची वानवा अशा त्रुटींमुळे रुग्णसेवा प्रभावित होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. स्थानिक पातळीवर रुग्णालय प्रशासनालाही औषधी खरेदी करण्यासाठी काही मर्यादा येत असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.
काही महिन्यांपूर्वी मनोरुग्णाकडून झाली होती मारहाण
जिल्हा सामान्य रुग्णालय येथे मनोरुग्णांसाठी आवश्यक औषधांचा साठा नसल्याने अनेक रुग्णांना औषधांशिवाय रुग्णालयातून परतावे लागत आहे. काही महिन्यांपूर्वीच रुग्णालयातील एका फार्मासिस्टला औषधांसाठी एका मनोरुग्णाकडून मारहाण झाल्याची घटनाही घडली होती.रुग्णालयात औषधसाठा कमी असल्याने रुग्णांना कमी प्रमाणात औषधे देण्यात येत आहे. शासनाकडे औषधांची मागणी केली असून, डीपीडीसीमधूनही काही प्रमाणात औषधी खरेदी करण्यात येत आहे.डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्य चिकित्सक, इर्विन