अमरावती : मुलाच्या एमबीबीएस प्रवेशापोटी येथील एका डॉक्टरने तब्बल १.३३ कोटी रुपये गमावले. १७ मार्च रोजी गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी, त्या डॉक्टरच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी आरोपी रोहन मधुकर भेंडे (रा. करजगाव, ता. चांदूरबाजार, ह.मु. रायगड) याच्याविरुध्द फसवणूक व बदनामीचा गुन्हा दाखल केला.
जयप्रकाश बनकर (रा. तारांगणनगर) असे गंडविलेल्या गेलेल्या डॉक्टरचे नाव आहे. बनकर यांचा मुलगा सांदिपान याला एमबीबीएसला प्रवेश हवा होता. नेमके तेच हेरून सांदिपानची नागपूरस्थित लता मंगेशकर मेडिकल कॉलेजमध्ये इन्स्टिट्युशनल कोट्यातून एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो, आपली तशी तेथे ओळख आहे. अशी बतावणी रोहन भेंडे याने डॉ. बनकर यांच्याकडे केली. या व्यवहारात एका महिलेने मध्यस्थी केली.
कॅम्पस्थित एनसीसी कॅंटीननजीकच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या त्या महिलेच्या घरी तो संपूर्ण व्यवहार झाला. १ ऑक्टोबर २०२२ रोजी २५ लाख रुपये रोख, ७ ऑक्टोबर रोजी २ लाख रुपये, ९ ऑक्टोबर रोजी ४२,५० लाख रुपयांचा कॅन्सल धनादेश, त्याचदिवशी ५७ लाख ५० हजार रुपये रोख, २ नोव्हेंबर २०२२ रोजी फॉर्म सबमिशनसाठी दोन लाख रुपये, तर १५ नोव्हेंबर २०२२ रोजी ४७ लाख रुपये असे एकूण १ कोटी ३३ लाख ५० हजार रुपये डॉ. बनकर यांनी आरोपीला दिले.
पैसे परत मागितले, मिळाली धमकी
इतकी रक्कम दिल्याने आपल्या सांदिपानची ॲडमिशन पक्की म्हणून डॉ. बनकर यांनी आरोपीवर प्रचंड विश्वास टाकला. मात्र वेळ निघून जात असतानाही मुलाची ॲडमिशन होत नसल्याचे पाहून बनकर यांनी आरोपीला अनेकदा कॉल केले. ॲडमिशन होत नसेल, तर पैेसे परत देण्याची विनंती बनकरांनी केली. त्यावर आरोपीने धमकीचे व्हिडिओ पाठवून समाजात बदनामी करण्याची धमकी दिली.
धनादेशावर बनावट सही
दरम्यान, डॉ. बनकर यांनी पैशासाठी तगादा लावला असता, आरोपीने एका कंपनीच्या नावाचे दोन पोस्टडेटेड चेक बनकर यांना दिले. ते डिपॉझिट केले असता, त्या धनादेशावरील सह्या बनावट असल्याचे बँकेने कळविले. तसेच त्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याचेही बँकेने स्पष्ट केले. त्यामुळे बनकर यांनी पत्राद्वारे दुसरा धनादेश तथा बँक खात्यात पुरेशी रक्कम ठेवण्याची विनंती केली. त्यावर आरोपीने पुन्हा बनकरांना धमकीचा व्हिडिओ पाठविला.