उज्वल भालेकर, अमरावती: आतड्याला छिद्र असलेला एक गंभीर रुग्ण हा शुक्रवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. यावेळी त्याची गंभीर प्रकृती लक्षात घेता, डॉक्टरांनी त्याला आयसीयू विभागात दाखल केले. परंतु त्याची बिघडत चाललेली प्रकृती लक्षात घेता, तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमुने तातडीने या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. तब्बल तीन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर या रुग्णाला नवे जीवनदान मिळाले आहे. विशेष म्हणजे, शासकीय सुट्टीच्या दिवशी डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली.
विनोद महींगे (४८) या रुग्णाला अल्सरमुळे पोटात इजा होऊन त्याच्या आतड्याला छिद्र पडले होते. बदललेली जीवनशैली, धकधकीच्या जीवनात चुकीच्या जेवणाच्या वेळा, चुकीचा आहार, जंक फूड, कामातील अथवा घरातील मानसिक तणाव, धुम्रपान, तंबाखूचे सेवन, मद्यपान या सारख्या सवयीमुळे पोटाचा अल्सर होतो. अल्सर पोटातल्या कोणत्या भागात व किती मोठा यावर त्याचा त्रास ठरतो. आजाराचे स्वरुप जास्त असल्यास जठर किंवा आत्याड्यांन इजा होऊन छिद्र पडते. विनोद महींगे यांच्याही आतड्याला छिद्र पडल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यामुळे शुक्रवारी महींगे यांना इर्वि रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी महींगे यांचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टरांनी तातडीने त्यांची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. यावेळी डॉ. संतोष राऊत आणि डॉ. भुषण ठाकरे, बधीरीकरणतज्ज्ञ डॉ. आशिष भोगे यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. या रुग्णांचे प्राण वाचिवण्यासाठी आयसीयू चमु, ओटी चमु, तसेच डॉ. अंकुश झोडे, आणि डॉ. योगेश सेवाने यांनीही मदत केली. विनोद महिंगे यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून सध्या आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.