एनआयसीयूला कुलूप : नवजात शिशू मृत्यूप्रकरणाचा धसकालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नवजात शिशुंच्या मृत्युप्रकरणानंतर येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयातील बालरोग विभागावर मरगळ आल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत बालरोग विभागात आठ ते दहा रुग्ण दाखल आहेत. मात्र, निवासी डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे ईमर्जन्सीसाठी वरिष्ठ डॉक्टरांनाच कॉल करून बोलाविले जात असल्याचे निरीक्षण ‘लोकमत’ने बालरोग विभागाचा आढावा घेतल्यानंतर नोंदविले आहे. हीच स्थिती राहिल्यास आणखी बालमृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. २९ मे रोजी मध्यरात्री चार शिशुंचा एकापाठोपाठ एक मृत्यू झाल्यानंतर राज्यभरात हा विषय चर्चेचा झाला होता. निवासी चिकित्सकांनी बालरोग विभागात २४ तास उपस्थित राहणे अनिवार्य आहे. त्यासाठी निवासी डॉक्टरांचे पद निर्माण करण्यात आले आहे. आकस्मिक सेवेसाठी निवासी डॉक्टर उपलब्ध असल्यास रुग्णांना तत्काळ आरोग्य सेवा पुरविली जाऊ शकते. मात्र, उपरोक्त चार शिशुंच्या मृत्युच्यावेळी एनआयसीयूत निवासी डॉक्टर उपलब्ध नव्हते. चुकीचे इंजेक्शन दिल्यापासून तर शिशुंच्या मृत्युपर्यंत कोणत्याही डॉक्टरांनी एनआयसीयूकडे लक्ष न दिल्याचे चौकशी अहवालातून स्पष्ट झाले आहे. आता महिना ओलांडला असून अद्यापही बालरोग विभागाची स्थिती ‘जैसे थे’ आहे. ‘लोकमत’ने पीडीएमसीच्या बालरोग विभागाचा रविवारी आढावा घेतला असता त्या ठिकाणी आठ ते दहा बाळ दाखल असल्याचे दिसून आले. परिचारिकांना डॉक्टरांविषयी विचारणा केली असता निवासी डॉक्टर उपलब्ध नसून वरिष्ठ डॉक्टरांना कॉल करून बोलाविण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे एखाद्या बाळाची प्रकृती बिघडल्यास त्याला तत्काळ आरोग्यसेवा मिळणे कठीण असल्याचे चित्र आहे. बालरोग विभागात तीन सत्रात तीन कनिष्ठ निवासी चिकित्सक व एक वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ आवश्यक आहे. मात्र, पीडीएमसीत तुर्तास तशी स्थिती नसल्याचे आढळून आले. निवासी डॉक्टरांनी राजीनामे दिल्यामुळे त्यांच्या जागी अन्य निवासी डॉक्टर येण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. दोन बालरोगतज्ज्ञांचा राजीनामापीडीएमसीतील बालरोग विभागात कार्यरत दोन बालरोगतज्ज्ञांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे. ३ जुलै रोजी बालरोगतज्ज्ञ ऋषिकेश घाटोळ व कौस्तुभ देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. नवजात शिशुंच्या मृत्युप्रकरणानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीला अनुसरून बालरोगतज्ज्ञांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.
पीडीएमसीतील बालरोग विभाग निवासी डॉक्टरविनाच
By admin | Published: July 10, 2017 12:07 AM