वैभव बाबरेकर अमरावतीअतिदुर्गम, अविकसित मेळघाटात सेवा देणाऱ्या डॉक्टरांची नेहमीच वानवा असते. यासाठी शासनाने शासकीय नोकरीत नव्याने रूजू होणाऱ्या डॉक्टरांना पहिली तीन वर्षे मेळघाटात सेवेची सक्ती केली आहे. परंतु तरीही मेळघाटात जाण्याकरिता तरूण डॉक्टर तयार नसल्याने आरोग्य विभागाला तज्ज्ञ डॉक्टरांसाठी अक्षरश: पायघड्या घालाव्या लागत आहेत. मेळघाटचा अतिदुर्गम भाग हा सदैव उपेक्षित असतो. शिक्षक असो वा डॉक्टर कोणालाही मेळघाटात नियुक्ती नको असते. मूलभूत सोयी-सुविधांपासून लांब, वनवासी जीणे कोण पदरी पाडून घेणार? आरामदायी नोकरीची स्वप्ने पाहणाऱ्या तरूण पिढीच्या अंगावर तर मेळघाटच्या नावाने काटाच उभा राहतो. परिणामी येथील आदिवासींना वर्षानुवर्षे आरोग्याच्या सोर्इंपासून वंचित रहावे लागते. कुपोषणाने बालमृत्यूंचा आकडा दिवसेंदिवस फुगत आहे. ही बाब हेरून शासनाने नव्याने शासकीय नोकरीत येणाऱ्यांना मेळघाटात तीन वर्षे सेवेची सक्ती केली आहे. परंतु ही तीन वर्षे मेळघाटात घालविण्यास तरूण डॉक्टर तयार नाहीत. लाखो रूपये खर्च करून मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग निरक्षर, अंधश्रध्दाळू, गोरगरीब आदिवासींसाठी करण्याची यांची मानसिकता नाही. अशा स्थितीत आरोग्यसेवा सुधारावी कशी, असा प्रश्न आरोग्य विभागाला पडला आहे.
मेळघाटात सेवा देण्यास डॉक्टरांचा नकार
By admin | Published: November 29, 2014 12:29 AM