(असायमेंट)
अमरावती : सध्या अनलॉकनंतर सर्व काही सुरळीत सुरू झाले आहे. कोरोना नियमावलींचे पालन करून विशेष रेल्वे गाड्यादेखील धावत आहेत. मात्र, पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद असल्याने गरीब, सामान्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. गाव-खेड्यांमध्ये प्रवास करताना विशेष रेल्वेने शक्य होत नाही. त्यामुळे पॅंसेजर गाड्या त्वरित सुरू कराव्यात, अशी मागणी पुढे येत आहे.
रेल्वे बोर्डाने एक्स्प्रेस, मेल, गितांजली अशा लांब पल्ल्याच्या विशेष गाड्या धावत आहे. मात्र, विशेष, एक्स्प्रेस गाड्यांनी प्रवास हा महागडा असल्याने अनेकांनी एसटी अथवा खासगी ट्रॅव्हल्सला पसंती दिली आहे. अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकाहून लांब पल्ल्याच्या गाड्या धावत असल्या तरी यात एकही पॅसेंजर सुरू नाही. त्यामुळे छोट्या रेल्वे स्थानकावर प्रवास करता येत नाही. पॅसेंजर गाड्या बंद असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. एक्स्प्रेस, मेल रेल्वे जोरात सुरू असताना पॅसेंजर गाड्या सुरू झाला तर कोरोना पसरणार का, असा सवाल सामान्य प्रवाशांनी उपस्थित केला आहे. विशेष रेल्वे गाड्यांचे प्रतिव्यक्ती १५ रुपये जादा दर आकारले जात असल्याची ओरड आहे.
-----------------
सध्या सुरू असलेल्या एक्स्प्रेस
- हावडा-कुर्ला एक्स्प्रेस
- हावडा- मुंबई गितांजली एक्स्प्रेस
- गोंदिया- मुंबई विदर्भ एक्स्प्रेस
- अमरावती- मुंबई, पुणे, तिरूपती एक्स्प्रेस
- अहमदाबाद-चैन्नई नवजीवन एक्स्प्रेस
-----------------
सध्या सुरू असलेल्या विशेष रेल्वे गाड्या
- नागपूर-पुणे एक्सप्रेस
- ओखा-पुरी द्वारकानाथ एक्स्प्रेस
- भुसावळ-निझामुद्दिन दिल्ली गोंडवाना एक्स्प्रेस
- अजनी-पुणे एक्स्प्रेस
---------------
बॉक्स
मग पॅसेंजर बंद का?
गतवर्षी मार्चपासून कोरोना संसर्गामुळे पॅसेंजर गाड्या बंद आहेत. यात भुसावळ-नागपूर, वर्धा-भुसावळ, अमरावती-नागपूर इंटरसिटी, अमरावती-भुसावळ, भुसावळ-बल्लारशा, अमरावती-नागपूर या पॅंसेजर गाड्या आजतायागत बंद आहेत. जे नियम, निकष विशेष गाड्यांना लागू केले, तेच पॅसेंजर गाड्यांना लागू करून प्रवाशांची गैरसोय टाळा, अशी मागणी आहे.
---------------
विशेष, एक्स्प्रेस गाड्यांसाठी लागू असलेली नियमावली पॅसेंजर गाड्यांसाठी बंधनकारक करून आता त्या सुरू करणे गरजेचे आहे. मागील दीड वर्षांपासून गाव, खेड्यांतील प्रवास पॅसेंजरअभावी महाग झाला आहे.
- विकास डोंगरे, प्रवासी.
------------
दीड वर्षापासून कोरोनामुळे नातेवाइकांच्या भेटीगाठी दुर्लभ झाल्या आहेत. आता सर्व सुरळीत असताना विशेष रेल्वे गाड्यांचा प्रवास सामान्यांना परवडणारा नाही. शेगावीच्या संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी पॅसेंजर गाडी सोयीची आहे.
- पार्वतीबाई सावरकर, प्रवासी
----------
कोट
रेल्वे बोर्डाकडून अद्याप पॅसेंजर गाड्या सुरू करण्याविषयी आदेश आले नाहीत. तसे काही आदेश आल्यास पॅसेंजर गाड्या सुरू करता येतील.
- महेंद्र लोहकरे, प्रबंधक, अमरावती रेल्वे स्थानक.