वरूड : कोरोना काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लॉकडाऊन व जमावबंदी आदेश काढण्यात आला. यात आस्थापना तसेच बार, दारूची दुकाने बंद आहेत. असे असताना लाखो रुपयांची दारू नेहमीपेक्षा ५० रुपयांपासून तर दीडशे रुपये अधिक घेऊन सर्रास विकली जात आहे. शौक पूर्ण करण्याकरिता तळीराम अधिक पैसे खर्च करून देशी- विदेशी दारू विकत घेत असल्याची खमंग चर्चा आहे. याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिसांचेही दुर्लक्ष असल्याची चर्चा असून रात्रीची संचारबंदी कुचकामी ठरत आहे.
शहरासह संपूर्ण तालुक्यात रात्रीही दारू सर्रास मिळत असून त्यासाठी दीडपट पैसे तळीरामांना मोजावे लागत आहे. वाढत्या कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी लागू केली. मात्र तळीरामांना रान मोकळे आहे. काही बार रेस्टारंट रात्रीने दर्शनी भागात बंद तर मागच्या दारातून सुरू असतात. याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिसांचे सुद्धा दुर्लक्ष असल्याने तळीरामांना विनाकारण आर्थिक फटका बसतो, तर नियमाचीसुद्धा पायमल्ली होत असल्याने न्याय कुणाला मागावा, हा प्रश्न आहे. अवैध दारू विक्री होत असताना प्रशासन डोळेझाकपणा करीत आहे. तळीरामांनी अधिक रक्कम देऊन खरेदी केलेली दारू पिण्याकरिता रस्त्याचा वापर होत आहे. रस्त्यावरच वाहनात बसून दारू रिचवण्याचे प्रकार वाढीस लागले आहे.
वरूड शहरातून बाहेर जिल्ह्यात तस्करी
वरूड शहर तस्करीमध्येसुद्धा मागे नसून, अवैध धंद्यासह अवैध दारूची तस्करी मोठ्या प्रमाणावर केल्या जाते. अनेकवेळा पोलिसांनी पकडलेल्या दारूचा अहवाल उत्पादक कंंपनीसह राज्य उत्पादन शुल्क विभागाला देण्यात येतो. मात्र, लॉट नंबर असूनही कारवाई होत नाही.
------