अमरावती : शहराला सांस्कृतिक वारसा आहे. शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक आहे. घटना समितीचे सदस्य, पहिल्या महिला राष्ट्रपती या शहराने दिले आहेत. मात्र, काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापनेचा वाद निर्माण केला जात आहे. जिल्ह्याला पेटवत ठेवण्याचे काम सुरू आहे. लोकप्रतिनिधींची वागणूक ही योग्य नाही. आता नागरिकांना शांतता हवी. कुणालाही वेठीस धरू नका. चिल्लरगिरी खपवून घेणार नाही, अशी रोखठोक भूमिका पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी बुधवारी पत्रपरिषदेतून व्यक्त केली.
शिवाजी महाराज असो वा अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्याचा मुद्दा, सर्वोच्च न्यायालय, शासन, प्रशासनाने गाईड लाईन ठरवून दिली आहे. असे असताना आराध्यदैवतांचे पुतळे रात्रीतून कशासाठी बसविता, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खासदार, आमदार राणा दाम्पत्याचे नाव न घेता वेठीस धरण्याचे राजकारण कोण करीत आहे, याची जाण जिल्हावासीयांना असल्याचा टोलाही पालकमंत्री ठाकूर यांनी लगावला. राजापेठ उड्डाणपुलावरील शिवरायांचा अनधिकृत पुतळा हा प्रशासनाने काढला. बदनाम मात्र काँग्रेसला केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा शहरात योग्य ठिकाणी बसविला जाईल.
शासन, प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवरायांच्या पुतळ्यावरून गर्दी करणे, कोरोना नियमांचे उल्लंघन करणे, जिल्ह्याला बदनाम करण्याचे काम लोकप्रतिनिधींना शोभत नाही, असेही पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या. शिवरायांच्या पुतळ्याचा वाद निर्माण करण्यामागे महापालिका निवडणुकीचे राजकारण असल्याची शंकादेखील त्यांनी व्यक्त केली. महापुरुषांचे पुतळे रात्रीतून, चोरीछुपे बसविण्यापेक्षा दिमाखदारपणे सर्वसंमतीनेच नागरिकांच्या साक्षीने स्थापन करू, असे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.
पत्रपरिषेदला आमदार बळवंत वानखडे, माजी राज्यमंत्री सुनील देशमुख, प्रदेश प्रवक्ते दिलीप एडतकर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, किशोर बोरकर, विलास इंगोले, अंजली ठाकरे, जयश्री वानखडे, जयवंत देशमुख, बाळासाहेब हिंगणीकर आदी उपस्थित होते.
दर्यापूर येथील पुतळ्याला काँग्रेसचा विरोध नाही - आमदार वानखडे
दर्यापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा हटविण्याचा वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार बळवंत वानखडे यांनी शिवरायांच्या पुतळ्याला काँग्रेसचा विरोध नाही. हा पुतळा नियमानुसार स्थापन व्हावा. शासन-प्रशासनाकडून योग्य त्या परवानगी मिळवली जाईल, असे ते म्हणाले.