तिसऱ्या लाटेची चाहूल, बालकांत पाेस्ट कोविड सिंड्रोम, मल्टी इन्फ्लोमेट्री सिन्ड्रोमही येतोय समोर
अमरावती : आता निष्पन्न होत असलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये बालकांची १२ ते १५ टक्के आकडेवारी पुढे आली आहे. ९० टक्के बालके लक्षणे आढळून न येणारे कोरोना संक्रमण होऊन बरी होतात. मात्र, पोस्ट कोविड गुंतागुंत काही रुग्णांत दिसून आली आहे. याशिवाय तिसऱ्या लाटेत बालकांसह गर्भवती मातांमध्ये कोरोनाची लागण अधिक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपला तरी मुलांना घराबाहेर सोडण्याचा गाफीलपणा करू नका, बालकांची काळजी घ्या, असा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला आहे.
कोरोनाबाधित झाल्यावर बालके पाच ते सहा दिवसांत बरी होत असली तरी महिनाभराने लक्षणे नसलेल्या बालकांना इतर गुंतागुंतीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बालकांची काळजी घेऊन त्यांना कोरोना होऊच नये, याकडे पालकांनी लक्ष द्यावे. मात्र, प्रामुख्याने चाचणीकडेच दुर्लक्ष दिसून येत आहे. पालकांनी लक्षणे निदर्शनास येताच मुलांची तपासणी करून घ्यावी तसेच त्यांना घराबाहेर पडू देऊ नये. कोरोनासंबंधी नियम, त्रिसूत्रीची सवय आत्मसात करायला लावावी व त्याचे पालन करण्यास प्रोत्साहन द्यावे, असा सल्लाही बालरोगतज्ज्ञांनी दिला आहे.
बॉक्स
मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे कोणती?
१) लहान मुलांत ९० टक्के बाधितांत लक्षणे दिसून येत नाहीत, तर काही जणांना सौम्य लक्षणे दृष्टीस पडतात. ते औषधोपचाराने बरे होत आहेत.
२) लक्षणे नसलेल्या ज्या बालकांना कोरोनाची बाधा होऊन गेली, त्यांच्यात मल्टी इन्फ्लोमेट्री सिन्ड्रोम, पोस्ट कोविड सिंड्रोम दिसत आहेत. ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास, जुलाब, अंगदुखी, अंगावर पुरळ येण्याची लक्षणे दिसत असल्याचे डॉ. हेमंत मुरके म्हणाले.
३) खूप ताप येणे, ताप कमी न होणे, अंगावर पुरळ येणे, रॅश येणे, काही रुग्णांत लिव्हरवर सूज येणे, ह्रदयाच्या रक्तवाहिन्यांवर सूज येणे यात येणाऱ्या क्लिष्टता याला मल्टी इन्फ्लोमेट्री सिंड्रोम इन चिल्ड्रेन (एमआयएससी) असे म्हणतात.
४. पोस्ट कोविडमध्ये आरटी-पीसीआर निगेटिव्ह आणि अँटिबॉडी पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. त्याकडे पालकांसह बालरोगतज्ज्ञांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे बालरोगतज्ञ्ज डॉ. नीलेश मोरे यांनी व्यक्त केली.
-------------------
पॉइंटर
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित : ८३ हजार ८००
जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्त : ७२ हजार १३४
दुसऱ्या लाटेतील रुग्ण : ३८ हजार ३२५
कोरोनाचे १८ वर्षांखालील रुग्ण: ३३५२
१० वर्षापेक्षा कमी वयाचे रुग्ण : ९४८
------------------
बॉक्स
बाल रुग्णांसाठी आरोग्य यंत्रणेचे नियोजन
मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. या कोरोनाग्रस्तांना पोस्ट कोविड सिंड्रोमचा सर्वाधिक धोका असल्यामुळे आरोग्य यंत्रणा नियोजन करीत आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, इन्फ्रास्ट्रक्चर किती लागेल, कोणते इंजेक्शन, औषधी लागतील, याबाबत बालरोगतज्ज्ञांची मते जाणून घेण्यात येत आहेत. प्रसूती विभाग आणि नवजात शिशू विभाग एकत्रित करण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, सुपर स्पेशालिटीच्या पाच डॉक्टर्सना प्रशिक्षण दिले आहे. सध्या असलेले व्हेंटिलेटर अपग्रेड करावे लागतील, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी सांगितले.
------------------
कोट
१५ वर्षांपर्यंतच्या मुलांची प्रतिकारशक्ती चांगली असते. त्यामुळे ते बऱ्यापैकी सुरक्षित आहेत. तरीही आई-वडिलांनी गाफील राहू नये. मुलांना लॉकडाऊननंतरही बाहेर फिरताना, खेळताना, केव्हाही घराबाहेर पडताना कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्याचे सर्व उपाय, मास्क, सुरक्षित अंतर, हाताची स्वच्छता याबाबत शिकवले पाहिजे. संसर्गापासून वाचलेल्यांना पुढच्या लाटेमध्ये लस मिळेपर्यंत संसर्गाचा धोका अधिक असेल. त्यामुळे कोणतेही लक्षण असेल, तर निष्काळजीपणा न ठेवता तपासणी करून घ्यावी.
- डॉ. हेमंत मुरके, बालरोगतज्ज्ञ
--------------
कोट
दुसऱ्या लाटेतही बालके कोरोनाबाधित झाली. मात्र, पालकांनी वेगवेगळी कारणे सांगून टेस्ट टाळल्याने दिसून आले आहे. ९० टक्के बालकांत लक्षणे नसलेला किंवा सौम्य लक्षणे असलेलल्यांनाच आजार दिसून येतोय. तरीही तपासणी गरजेची आहे. आता जी मुले बाधित होऊन गेली. त्यांना महिनाभराने पोस्ट कोविड सिंड्रोम दिसून येतोय. त्यात खूप ताप, अंग डोळे लाल होणे, दम लागणे अशी लक्षणे दिसून येतात. दुसऱ्या लाटेतील ती मुले आता रुग्णालयात यायला सुरुवात झाली आहे. त्यांचे उपाचार नॉन-कोविडमध्ये होताहेत. तपासणी टाळू नका. मुलांच्या अंगावर दुखणे काढू नाका.
-डॉ. नाजीम अक्रम, बालरोगतज्ज्ञ
-----------------
कोट
मुलांना कोरोनाची लागण होऊच नये, यासाठी पालकांनी दक्षता घेतली पाहिजे. गर्दीत जाणे टाळावे. मास्क वापरणे, मुलांची खेळणी व त्यांच्या खेळण्याची जागा स्वच्छ करणे, लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करतात. त्यामुळे मोठ्यांनी नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे. विलगीकरणात घरातील व्यक्तीवर उपचार सुरू असल्यास मुलांना त्यांच्याजवळ जाण्यापासून रोखणे, नवजात शिशूला कोरोनासदृश लक्षणे असल्यास किंवा कोरोना झाल्यास मातेपासून दूर ठेवू नये. स्तनपान रोखू नये. मुलांच्या पौष्टिक आहार, पुरेशी झोप, शारीरिक कसरतीवर लक्ष द्यावे.
- डॉ. नीलेश मोरे, बालरोगतज्ज्ञ