परतवाडा : मुसळधार पावसामुळे परत एकदा अचलपूर तालुक्यातील सपन, चंद्रभागा व शहानूर धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यात सपन प्रकल्प ८८ टक्के, चंद्रभागा प्रकल्प ८६ टक्के, तर शहानूर प्रकल्प ७५ टक्के भरला आहे.सपन नदी प्रकल्पाचे चारही दरवाजे बुधवारी सायंकाळी दुसऱ्यांदा उघडले गेले. पहिला आणि शेवटचा दरवाजा १० सेमी, तर मधले दोन दरवाजे ५ सेंटिमीटरने उघडण्यात आले आहेत. चंद्रभागा प्रकल्पाची दोन दारे गुरुवारी उघडण्यात आली, तर शहानूर प्रकल्पाचे दोन दरवाजे प्रत्येकी पाच सेंटिमीटरने उघडण्यात आले. शाखा अभियंता गौरव आवनकर व उपविभागीय अभियंता सुबोध इंदूरकर हे कार्यकारी अभियंता उ.ज. क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात लक्ष ठेवून आहेत. यापूर्वी ३० जुलैला सपन धरणाचे चारही दरवाजे १० सेमीने उघडण्यात आले होते. पुढे १ आॅगस्टला सायंकाळी दोन दरवाजे बंद करण्यात आले.दरम्यान, जलसाठ्यातील वाढ बघता, ७ आॅगस्टला सायंकाळी ते दोन दरवाजे उघडले गेलेत. सध्या धरणाच्या चारही दरवाजांंमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सपन प्रकल्पापाठोपाठ अचलपूर तालुक्यातील चंद्रभागा धरणही ८६ टक्के भरले. सहायक अभियंता श्रेणी-१ आर.एस. मोहिते आपल्या सहकाऱ्यांसमवेत चंद्रभागा प्रकल्पावर तळ ठोकून आहेत. चंद्रभागा प्रकल्पाला तीन दरवाजे असून, यातील पहिला आणि तिसरा दरवाजा प्रत्येकी ५ सेमीने उघडण्यात आला. नदीकाठी लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सपन, चंद्रभागा, शहानूरची दारे उघडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 1:44 AM