लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सव्वा वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येऊन २० दिवस उलटले असताना चेहरापालट न झाल्याने भाजपक्षात सुप्त सत्तासंघर्ष उफाळला आहे. निवडणुकीच्या तोंडावर महापौर उपमहापौरांच्या चेहऱ्यात बदल नको, या भूमिकेपर्यंत भाजप नेतृत्व पोहोचल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे. त्यामुळे नरवणे-टिकले-काळे त्रयींचा उघडपणे कुणीही विरोध करत नसले तरी पक्षस्तरावर मोठी बेदिली माजली आहे.प्रवीण काशीकर यांच्यानंतर तब्बल दीड तपाने महापौरपद ‘एससी’साठी राखीव झाले. त्यामुळे आता भाजपमधील दोघांची स्थिती ‘अभी नही तो कभी नही’ अशी झाली आहे. दोघेही इच्छुक आ. सुनील देशमुख यांच्या शब्दाचा मान राखणारे आहेत. मात्र, भाजपने नरवणेंना बाजूला सारत इतरांना आता संधी दिली पाहिजे, असा मतप्रवाह इच्छुकांमध्ये आहे. दुसरीकडे नरवणे यांच्या जागी अन्य विजय वानखडे यांनाही संधी दिल्यास महापौरपद पुन्हा त्यांच्याकडेच का, म्हणून भाजपक्षातून वानखडेंच्या नावाला विरोध होत आहे. नरवणेही देशमुखांचेच पाईक आणि वानखडेही त्यांचेच कट्टर समर्थक त्यामुळे कुरीलही नको आणि वानखडेही नकोत, या भूमिकेपर्यंत भाजपमधील काही नेते पोहोचले आहेत. इच्छुकांचे गॉडफादर सर्वश्रुत असल्याने ते त्यांच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत. संभाव्य पडझड थांबविण्याची जबाबदारीही चेहरेपालट न केल्यास आपसुकच त्यांच्या गॉडफादरवर येईल. त्यामुळे मध्यम मार्ग काढून चेहरे ‘जैसे थे’ ठेवावेत, या अखेरच्या भूमिकेपर्यंत स्थानिक नेते पोहोचले आहेत. मात्र, यानिमित्त इच्छुकांसोबतच भाजपच्या अन्य गोटातही सुप्त सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे.उपमहापौर, पक्षनेत्यांकडेही नजरनरवणे बदलल्यास टिकले आणि सभागृहनेता सुनील काळे यांनाही राजीनामा द्यावा लागेल. महापौरपदासाठी जसे नऊ जण इच्छुकआहेत, त्याचप्रमाणे उपमहापौरपदाकडे २० ते २२ जण व पक्षनेतेपदाकडे ५ ते ६ नगरसेवक आस लावून बसले आहेत. त्यामुळे प्रश्न केवळ महापौरपदाच्या चेहरापालटाचा नव्हे, तर उपमहापौर आणि सभागृह नेतेपदाकडे डोळे लावून बसलेल्या दोन ते अडीच डझन इच्छुक नगरसेवकांचा आहे. चेहरेपालटावरुन स्थानिक भाजपमध्ये बंडखोरीचे बीजारोपण झाले, हे मात्र नाकारता येणार नाही.
भाजपात सुप्त सत्तासंघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 10:37 PM
सव्वा वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येऊन २० दिवस उलटले असताना चेहरापालट न झाल्याने भाजपक्षात सुप्त सत्तासंघर्ष उफाळला आहे. निवडणुकीच्या तोंडावर महापौर उपमहापौरांच्या चेहऱ्यात बदल नको, या भूमिकेपर्यंत भाजप नेतृत्व पोहोचल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे. त्यामुळे नरवणे-टिकले-काळे त्रयींचा उघडपणे कुणीही विरोध करत नसले तरी पक्षस्तरावर मोठी बेदिली माजली आहे.
ठळक मुद्देमहापौरपदावरून गटबाजी उघड : इच्छुकांमध्ये असंतोष