अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संपूर्ण विभागाचे डिजिटायझेशन करण्यासाठी सन २०१७ मध्ये ‘डॉटकॉम इन्फोटेक’ या कंपनीकडे जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र, डिजिटायझेशनचे कामे अपूर्ण आणि देयकांप्रकरणी गठित चौकशी समितीचा अहवाल अप्राप्त असताना आता मार्च ‘एन्डींग’च्या नावे ५० लाखांचे देयकांसाठी फिल्डिंग लावली आहे. विशेषत: कुलगुरू मुरलीधर चांदेकर हे सुटीवर असताना त्यांच्या अनुपस्थितीत देयके काढण्याचा डाव रचला जात आहे.
विद्यापीठात वित्त व लेखा, अंकेक्षण, परीक्षा विभाग, सामान्य प्रशासन, पीएच.डी. सेल, गोपनीय, नामांकन अशा एकूण सर्वच विभागाचे कामकाज ऑनलाईन व्हावे, यासाठी डिजिटायझेशनची जबाबदारी ‘डॉटकॉम इन्फोटेक’कडे सोपविण्यात आली.
आतापर्यंत या कंपनीला कामापोटी २२ लाख रुपए देयके अदा करण्यात आली आहे. मध्यंतरी देयके अदा केल्याप्रकरणी चौकशी समिती गठित झाली. अहवाल अप्राप्त झाला नाही. मात्र, आता ‘डॉटकॉम इन्फोटेक’ संचालकाने थकीत ५० लाखांचे देयके मिळण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. मार्च एन्डींगच्या नावे त्वरित देयके काढण्यासाठी वित्त व लेखा विभागात फाईल वेगाने फिरत असल्याचे सूत्रांनी सांगितले. विद्यापीठाने २२ नोव्हेंबर २०१९ रोजी डब्ल्यूआययूएमएसच्या अंकेक्षण विभागाशी संबंधित समस्याविषयी ‘डॉटकॉम इन्फोटेक’ला कुलसचिवांच्या सूचनेनुसार नोटीस बजावली आहे.
------------
बॉक्स
‘डॉटकॉम इन्फोटेक’चा मास्टर माईंड कोण?
विद्यापीठात ‘डॉटकॉम इन्फोटेक’ कंपनीने डिजिटायझेशन वेळेत आणि अचूक निर्माण केले नाही. सॉफ्टवेअर पूर्णपणे विकसित नसताना उर्वरित ५० लाखांचे देयकांबाबत अदा करण्यासाठी एका बड्या अधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावल्याची माहिती आहे. त्यामुळे ‘डॉटकॉम इन्फोटेक’चा मास्टर माईंड कोण? याविषयीची बुधवारी जोरदार चर्चा रंगली. हा मुद्दा सन २०१९ मध्ये सिनेटमध्ये गाजला, हे विशेष.
---------------------
कोट
‘डॉटकॉम इन्फोटेक’च्या डिजिटायझनसंदर्भात गठीत चौकशी समितीचा अहवाल अप्राप्त आहे. देयके काढण्याबाबत कोणत्याही हालचाली नाहीत.
- एफ.सी. रघुवंशी, अधिष्ठाता तथा प्रभारी कुलगुरू