अमरावती : आईवडिलांकडून पाच लाख रुपये आणणे शक्य नसल्याने पत्नीने स्वत:चे दागिने मोडून पतीला २ लाख रुपये दिले. मात्र, त्यानंतरही सासरकडून होणारा त्रास कमी झाला नाही. उलट सततच्या मारहाणीला कंटाळून त्या महिलेने दोन मुलांना घेऊन माहेर गाठले. याप्रकरणी १३ एप्रिल रोजी विवाहितेच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी तिचा पती व अन्य चार जण (सर्व रा. जबता गल्ली, चांदणी चौक) यांच्याविरुद्ध कलम ४९८ अ अन्वये गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, १ नोव्हेंबर २०१६ रोजी जिल्ह्यातील एका तरुणीचे तनवीर अहमद इफ्तेखार अहमद याच्याशी लग्न झाले. लग्नाच्या दोन महिन्यांनंतरच तिच्या पतीसह सासरच्या मंडळीने तिचा छळ सुरू केला. दरम्यान त्या दाम्पत्याला दोन मुलेदेखील झाली. आपल्याला यवतमाळ येथील एका शाळेवर लिपिकपदाची ऑफर असून त्यासाठी माहेरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी तनवीर अहमदने केली. त्याला नकार दिल्याने तनवीर व मोहम्मद इफ्तेखार यांनी तिला मारहाण केली. तर मो. जफर अहमद, एक महिला व मो. असीम अहमद यांनी तिला धमकी दिली. तिला आईवडिलांसोबत देखील बोलू देत नव्हते. दरम्यान, पीडितेने स्वत:चे दागिने विकून पतीला २ लाख रुपये दिले. मात्र, त्यानंतरही त्रास थांबला नाही. त्यामुळे मागील दहा महिन्यांपासून दोन्ही मुलांना घेऊन ती माहेरी आली.
समेट नव्हे मिळाली धमकी
५ नोव्हेंबर २०२१ रोजी रती माहेरी असताना पतीसह अन्य चारही जण तेथे आले. तथा तिला शिवीगाळ करण्यात आली. आम्ही आमच्या मुलाचे दुसरे लग्न करून देणार आहोत, अशी धमकी तिला दिली. याबाबत महिला कक्षाकडे तक्रार करण्यात आली. मात्र, समेट घडून न आल्याने गुन्हा दाखल करण्यासाठी तो अर्ज गाडगेनगरला पाठविण्यात आला. पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.