दर्यापूर : भर उन्हात डीपी भडकल्याने बोराळ्यात २१ मे रोजी भीषण आग लागल्याची घटना घडली. अचानक आगीचा भडका उडाल्याने तारांबळ उडाली. मात्र, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. अनेकांच्या प्रयत्नाने ही आग आटोक्यात आली.
याबाबत वीज वितरण कंपनीकडे तक्रार करूनही दखल न घेतल्याने अभियंत्याविरुद्ध नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करीत त्यांचेवर कारवाईची मागणी केली. दर्यापूर तालुक्यातील बोराळा (आराळा) येथे दुपारी २ वाजताच्या सुमारास अचानक डीपीतून आगीचे लोळ उठले. डीपीच्या बाजूला इंधनासाठी सुकलेल्या पराट्या टाकलेल्या असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी डीपीच्या दिशेने धाव घेतली. तातडीने प्रत्येक व्यक्ती पाण्याच्या बादल्या, गुंड आणि पोहऱ्यातील पाणी टाकून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत होता. गावातील नागरिक गोविंदा डीके आणि काही तरुणांनी ट्रैक्टरबंडीमध्ये पाण्याचे मोठे ड्राम भरून आणले. तब्बल दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या घटनेमुळे ग्रामस्थाननी खोलापूर येथील वीज वितरण केंद्राच्या उपअभियंत्याविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे. आमच्या गावात डीपीवर भार वाढत आहे भविष्यात दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळीच लक्ष्य देऊन डीपीवरील वाढलेला भार कमी करण्यात यावा, अशी मागणी गावकरी करीत आहे.