लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे पालन करीत अमरावतीकरांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती घरोघरी साजरी केली. रस्त्यावर कोठेही गर्दी, जल्लोष नव्हता. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना बाबासाहेबांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. सोमवारी मध्यरात्री १२ नंतर अमरावती, बडनेरा शहरात डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात मोजकेच फटाके फोडून मुक्तिदात्याला वंदन करण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही आंबेडकरी अनुयायांसाठी उत्सव असतो. मात्र, यंदा कोरोना संकट दूर करण्यासाठी शासनाने २५ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केले. पोलीस, रुग्णालयीन कर्मचारी २४ तास राबत आहेत. त्यांना बळ देण्यासाठी संचारबंदीच्या काळात जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार भारतीय बौद्ध महासभा, शहरातील विविध बुद्ध विहार, सामाजिक संघटना, येथील ईर्विन चौकस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण समिती, बडनेरा येथील समता सामाजिक संघटना यांसह आंबेडकरी विचारसरणीच्या राजकीय पक्षांनीसुद्धा यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही घरीच साजरी करण्याचे आवाहन केले होते. मिरवणूक, मोटरसायकल रॅली, बुद्ध विहारात गर्दी अथवा सार्वत्रिक उत्सव साजरा करु नये, या आशयाचे पोस्टर, पॉम्प्लेट बुद्धविहार, वस्त्यांमध्ये लावण्यात आले होते. काही युवकांनी बैठकी घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करण्यासाठी जनजागृतीदेखील केली. परिणामी मंगळवारी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त कोठेही ढोल-ताशे, डिजे वाजला नाही. बुद्धविहारांवरील लाऊडस्पीकरही बंद ठेवण्यात आले होते. बुद्धवंदना सामूहिकपणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत ग्रहण करण्यात आली. शासकीय, प्रशासकीय कार्यालयांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जयंती साजरी करण्यात आली.गं्रथवाचनाने अभिवादनलॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ही घरीच साजरी करण्यात आली. एरवी वस्त्यांमध्ये जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी हा वर्षानुवर्षाचा शिरस्ता राहिला आहे. तथापि, मंगळवारी यापैकी काहीही झाले नाही. अनेकांनी वैचारिक श्रीमंतीचे दर्शन घडविले. गं्रथवाचन करून महामानवाला अभिवादन केले. यामध्ये युवकांचा मोठा सहभाग होता.सजावट, रोषणाई अन् पोस्टरबाजीला फाटाजिल्ह्यात बहुतांश आंबेडकरी अनुयायांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वस्त्यांमध्ये सजावट, रंगरंगोटी केली नाही. बुद्धविहार अथवा डॉ. आंबेडकर पुतळ्यांवर रोषणाईला फाटा देण्यात आला. सामाजिक, राजकीय पदाधिकाऱ्यांची पोस्टरबाजी दिसली नाही. देशावरील संकट हे प्रत्येक नागरिकाचे संकट आहे. अशी प्रचिती आंबेडकर अनुयायांनी आपल्या कृतीतून दिली.जिल्हा काँग्रेसतर्फे महामानवास अभिवादनअमरावती : जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्यावतीने मंगळवारी जिल्हाध्यक्षांच्या निवासस्थानीच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने शासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत गर्दी टाळण्यासाठी शासनाकडून नागरिकांना आवाहन होत आहे. २२ मार्चपासून संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशातच १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गर्दी टाळण्यासाठी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी घरीच जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्यावतीने महामानवाची १२९ वी जयंती साजरी केली.पोलीस प्रशासनाकडून हारार्पणयेथील इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला सोमवारी मध्यरात्री १२ नंतर हारार्पण करुन वाहतूक शाखेचे निरीक्षक राहुल आठवले, गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी पोलीस प्रशासनाकडून अभिवादन केले.इर्विन चौक निर्मनुष्यसंचारबंदी लागू असल्यामुळे पाचपेक्षा जास्त व्यक्तींना मनाई आदेश आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने सोमवारी सायंकाळी ७ च्या सुमारास इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला बॅरिकेडने वेढले होते. रात्रीपासूनच पुतळा परिसरात गर्दी होणार नाही, याची पोलीस प्रशासनाने कटाक्षाने काळजी घेतली. दरवर्षी गजबजणारा हा चौक मंगळवारी निर्मनुष्य होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती घरोघरी साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 5:00 AM
जिल्ह्यात बहुतांश आंबेडकरी अनुयायांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वस्त्यांमध्ये सजावट, रंगरंगोटी केली नाही. बुद्धविहार अथवा डॉ. आंबेडकर पुतळ्यांवर रोषणाईला फाटा देण्यात आला. सामाजिक, राजकीय पदाधिकाऱ्यांची पोस्टरबाजी दिसली नाही. देशावरील संकट हे प्रत्येक नागरिकाचे संकट आहे. अशी प्रचिती आंबेडकर अनुयायांनी आपल्या कृतीतून दिली.
ठळक मुद्देअनुयायांनी घडविला आदर्श : गर्दीला फाटा, बुद्धविहारात वैचारिक प्रबोधन