गावागावांत ऑक्सिमीटरचे वितरण, मोफत सल्ला, ४० दशकांपासून वैद्यकीय सेवेत
धामणगाव रेल्वे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अतिवेगाने वाढणारा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी गावोगावी पल्स ऑक्सिमीटरचे वितरण व मोफत सल्ला देत गरीब कोरोनाग्रस्तांसाठी धामणगावचे डॉ.अशोक भैया हे देवदूत ठरले आहेत.
धामणगाव तालुक्यात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक गावे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. अचानकपणे पसरत असलेल्या या संसर्गाने ग्रामीण जनता भयभीत होत आहे. त्यात रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजनचा तुटवडा, जिल्हा ठिकाणी बेडची मारामार, उपचार कसा व कुठे करावा याबाबत अज्ञान यामुळे अनेक रुग्णांचा घरीच उपचाराविना मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, या काळात शहरातील अमर शहीद भगतसिंग चौक येथे ४२ वर्षांपासून गरिबांच्या सेवेत असलेले डॉ. भैया यांचा दवाखाना कोरोनाग्रस्तांसाठी संजीवनी देणारे सल्ला केंद्र बनले आहे. वैद्यकीय क्षेत्रात बदलत्या काळानुसार अनेक डॉक्टरांची फी सुद्धा औषध-गोळ्यांएवढीच वाढली आहे. मात्र, डॉ. अशोक भैया यांची दवाखान्याची फी आजही तेवढीच अल्प आहे. कोरोनाकाळात आपल्या चिमुकल्याची कशी काळजी घ्यावी, याविषयी ते पालकांना एका वर्षापासून मोफत मार्गदर्शन करीत आहेत. वैद्यकीय सेवा हा व्यवसाय झालेला दिसत असला तरी डॉ. भैया हे यापासून अलिप्त आहेत. एखाद्या गरीब रुग्णाजवळ उपचाराची फी तर सोडाच, औषधी आणि गावापर्यंत जाण्यासाठी तिकिटाला स्वतः जवळचे पैसेसुद्धा ते अनेकदा रुग्णांना देतात. रेल्वे स्टेशन परिसरात आजारी पडलेल्या रुग्णांना ते मोफत औषधोपचार करीत आहेत.
कोरोनाच्या काळात ठरले देवदूत
तालुक्यातील अनेक गरीब रुग्ण त्यांच्या दवाखान्यात येतात. कोरोनाकाळात रुग्णाने भयभीत होऊ नये म्हणून त्यांनी गावोगावी ऑक्सिमीटर देऊन घरीच दर तीन तासांनी ऑक्सिजन पातळी परीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांना शासकीय रुग्णालयात कशी सेवा उपलब्ध होईल, यासाठी त्यांची धडपड सुरू असते. डॉ. भैया यांनी सुरू केलेल्या या अनोख्या उपक्रमाचे अनेक सामाजिक संघटनांकडून कौतुक होत आहे.
------------------
रुग्णांनी दर चार तासांनी शरीराचे तापमान तपासावे. ताजे आणि गरम अन्न खा. जास्तीत जास्त पेय पदार्थ घ्यावे. हात स्वच्छ व खोली हवेशीर ठेवावी. सहा मिनिटे चालल्यानंतर ऑक्सिजन पातळी ९५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास ताबडतोब सूचित करा. ताप असल्यास, श्वास घेण्यास त्रास असल्यास डॉक्टरांनी सुचवलेल्या रुग्णात दाखल व्हा.
- डॉ. अशोक भय्या, धामणगाव रेल्वे