अमरावती : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम प्रतिभा पुरस्काराचे नाव बदलून ते वायएसआर विद्या पुरस्कार केल्यानंतर समाजाच्या सर्व स्तरांतून टीकेची मोठी झोड उठली. त्यामुळे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारने हा निर्णय रद्दबातल केला आहे.
स्वातंत्र्यसंग्रामातील महनीय नेते मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त ११ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो. १० वी परीक्षेत सर्वोत्तम कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना माजी राष्ट्रपती व महान शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. कलाम यांच्या नावाने प्रतिभा पुरस्कार दिले जातात. हे पुरस्कार यापुढे वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या नावाने ओळखले जातील, असा जगनमोहन सरकारने सोमवारी काढलेला आदेश प्रचंड टीकेमुळे मंगळवारी मागे घेण्यात आला. पुरस्कार नामांतराच्या निर्णयावर टीका करताना तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू म्हणाले की, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी आयुष्यभर देशाची निरलस सेवा केली. ते अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत. अशा थोर व्यक्तीचे पुरस्काराला दिलेले नाव बदलण्याचा जगनमोहन सरकारचा निर्णय धक्कादायक आहे. (वृत्तसंस्था)नामांतराचा सपाटाजगनमोहन यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बनल्यानंतर काही योजनांची नावे बदलली आहेत. एनटीआर भरोसा योजनेचे वायएसआर पेन्शन कनुका, अण्णा कँटीन योजनेचे राजण्णा कँटीन, मध्यान्ह भोजन योजनेचे वायएसआर अक्षयपात्र, असे नामांतर करण्यात आले आहे.