आॅनलाईन लोकमतअमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११९ व्या जयंत्युत्सवानिमित्त २४ ते ३० डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. २७ डिसेंबर रोजी मुख्य कार्यक्रमाला राज्याचे शालेय, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे हे अतिथी राहतील, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.पंचवटी चौकानजीक शिवाजीनगर येथे स्मृती केंद्रावर २७ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता मानवंदना देण्यात येईल. १०.३० वाजता मुख्य कार्यक्रम सुरू होईल. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, महापौर संजय नरवणे, खा. आनंदराव अडसूळ, आ. सुनील देशमुख व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे उपस्थित राहतील. डॉ. पंजाबराव देशमुख जीवनचरित्राचे यावेळी प्रकाशन होईल.डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने २४ ते २७ डिसेंबर दरम्यान रोगनिदान शिबिर होणार आहे. अकोट येथे २४ व पापळ येथे २६ डिसेंबरला ही विशेष शिबिरे होतील. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांच्या मदतीने शहरात साफसफाई मोहीम राबविण्यात येईल. २४ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता श्रीमती विमलाबाई देशमुख सभागृहात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. पापळ येथे २५ डिसेंबरला सकाळी ९ वाजता पशुरोग निदान शिबिर, तर याच दिवशी सकाळी ११ वाजता पीडीएमसी आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कर्करोग तपासणी’ (मेमोग्राफी) व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकचे कुलगुरू दीपक म्हैसकर यांच्या हस्ते होईल.
शिवाजी विज्ञान परिषद २८ ला
प्रकाश धवड यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ वॉटर फिल्टरचे लोकार्पण होईल. २५ ला दुपारी १२ वाजता कृषी महाविद्यालयात कृषी मेळावा होईल. श्री शिवाजी उच्च माध्यमिकतर्फे विमलाबाई देशमुख सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी होईल. २६, २७ ला कृषी महा.तर्फे बिपीएड महाविद्यालयात पुष्प प्रदर्शन, २६, २८ ला चित्रकला महाविद्यालयात चित्रकला प्रदर्शनी होईल. शिवाजी संस्था व डॉ. होमी भाभा विज्ञान केंद्र, मुंबई यांच्यावतीने २८ ते ३० ला शिवाजी महाविद्यालयात पाचवी विज्ञान परिषद आयोजित केल्याचे हर्षवर्धन देशमुख यांनी सांगितले अशोक ठुसे, शेषराव खाडे, वि. गो. ठाकरे, प्रमोद देशमुख, पद्माकर सोमवंशी, कुमार बोबडे उपस्थित होते.