अमरावती : देशातील कृषी क्रांतीचे प्रणेते आणि शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांची जयंती अखेर शासनस्तरावर साजरी करण्याची मागणी पूर्ण झाली आहे. अमरावतीकर नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांच्या भावना लक्षात घेऊन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यासाठी पाठपुरावा केला. भाऊसाहेबांच्या अनुयायांत त्यामुळे आनंद पसरला आहे. भाऊसाहेबांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी झाला होता.
भारतातील प्रथम आंतरराष्ट्रीय कृषि प्रदर्शनाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल व विदर्भातील तळागळातील व्यक्तीपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचे कार्य भाऊसाहेबांनी केले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहचविताना वंचित घटकांना न्याय मिळवून दिला.
या महापुरुषाची जयंती शासन स्तरावर साजरी करण्यासाठी विविध संघटनांनी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला आघाडी शासनाने मंजुरी दिली. शासन निर्णय निर्गमित केला आहे.