अमरावती : बहुचर्चित आणि प्रतिक्षित चौथ्या महिला धोरणाचा मसुदा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज तसेच आई भवानीच्या चरणी अर्पण करण्यात आला.
प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या चरणी महिला धोरणाची प्रत अर्पण करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी महिलांना समान हक्क, सन्मान, सुरक्षितता मिळावी म्हणून केलेल्या कार्याची उजळणी म्हणून छत्रपतींच्या महिला धोरणाची सनद यावेळी यशोमती ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली.
‘स्त्रियांना समानतेची, न्यायाची वागणूक देणारे, स्त्रियांचे रक्षण करणारे जगातील पहिले राज्य म्हणून ओळख असलेल्या छत्रपती शिवरायांच्या चरणी महिला धोरणाचा मसुदा अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतल्याची प्रतिक्रिया मंत्री ठाकूर यांनी यावेळी दिली. तत्पूर्वी स्वराज्याचे कुलदैवत असलेल्या भवानीमातेच्या मंदिरात जाऊन विधिवत पूजा करण्यात आली. राज्यातील समस्त महिलांच्या कल्याणाचे आणि रक्षणाचे साकडे आई भवानीमातेकडे घालून मंत्री ठाकूर यांनी प्रतापगडावर शिवध्वजारोहणही केले.
यावेळी सातारा युवक काँग्रेसचे अध्यक्ष रणजित देशमुख, सातारा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अल्पना यादव, काँग्रेसच्या पदाधिकारी रोहिनी ढवळे, महिला व बालविकास अधिकारी उदय कुबले, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष मानसिंगराव जगदाळे, अर्थ व शिक्षण सभापती महादेव घुले यांच्यासह काॅंग्रेसचे कार्यकर्ते आणि अनेक शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेत उच्चस्तरीय समिती
महिला धोरण हे केवळ कागदावरच राहणार नाही, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत एक उच्चस्तरीय समिती त्यावर देखरेख करणार आहे. याशिवाय महिला व बालविकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्सही स्थापन करण्यात येणार आहे. यामुळे या धोरणाच्या अंमलबजावणीवर काटेकोर लक्ष राहणार आहे. तसेच या धोरणात आखून दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता ही युद्धपातळीवर होऊ शकेल. या धोरणामुळे या जेंडर बजेटची संकल्पना ही अधिक प्रभावीपणे राबवता येईल, असा विश्वास ना. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.