लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बहुचर्चित आणि प्रतीक्षित अशा चौथ्या महिला धोरणाचा मसुदा शनिवारी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज तसेच आई भवानीच्या चरणी अर्पण करण्यात येणार आहे. प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या चरणी महिला धोरणाची प्रत अर्पण केले जाईल. शिवरायांनी महिलांना समान हक्क, सन्मान, सुरक्षितता मिळावी म्हणून केलेल्या कार्याची उजळणी म्हणून छत्रपतींच्या महिला धोरणाची सनद ही यासमयी प्रकाशित करण्यात येईल.महिला धोरण आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, मात्र आता महिला धोरणाची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य, अशी ही महाराष्ट्राची ओळख नवीन धोरणामुळे होईल. महिलांसोबत इतर लिंगी समुदाय, समुदायाचा आवर्जून या धोरणात समावेश केलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत एक उच्चस्तरीय समिती त्यावर देखरेख करणार आहे. महिला व बाल विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स ही स्थापन करण्यात येईल. या धोरणाच्या अंमलबजावणीवर काटेकोर लक्ष राहील. या धोरणामुळे या जेंडर बजेटची संकल्पना ही अधिक प्रभावीपणे राबवता येईल, असा विश्वास ना. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
प्रतापगडच का? : देशाला आधुनिकतेचा विचार देणारे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते प्रतापगडावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले होते. शिवछत्रपती ते आजचा भारत व्हाया नेहरू असा भारताच्या पुरोगामीत्वाचा प्रवास आहे. या प्रवासाची आठवण म्हणून प्रतापगडाची निवड करण्यात आल्याचे ना. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.