अमरावती : जिल्ह्यातील १ एप्रिल ते ३१ डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ५५३ ग्रामपंचायतींकरिता प्रारूप मतदार याद्या संबंधित ग्रामपंचायतीसह तहसील व पंचायत समिती कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सदर यादीवर ७ डिसेंबरपर्यंत तहसील कार्यालयात हरकती दाखल करता येणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाभरातील ५५३ ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्याच्या हालचाली वेगवान केल्या आहेत. गत महिन्यात या ग्रामपंचायतींची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रमदेखील जाहीर केला. या कार्यक्रमानंतर या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगूल वाजण्याची शक्यता आहे. प्रभागनिहाय तयार केलेली ही मतदार यादी तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय व संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध केली आहे. प्रत्येक गावातील मतदारांनी ही यादी बघावी असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
बॉक्स
हरकती नोंदविता येणार
ग्रामपंचायतींच्या प्रारूप यादीबाबत हरकती असल्यास तहसीलदार त्यावर सुनावणी घेणार आहेत. हरकती निकाली काढल्यानंतर १० डिसेंबर रोजी या सर्व ग्रामपंचायतीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
बॉक्स
तालुकानिह्य ग्रामपंचायती अमरावती तालुक्यात ४६, भातकुली ३६, तिवसा २९, दर्यापूर ५०, मोर्शी ३९, वरुड ४१, अंजनगाव सुर्जी ३४, अचलपूर ४४, धारणी ३५, चिखलदरा २३, नांदगाव खंडेश्वर ५१, चांदूर रेल्वे २९, चांदूर बाजार ४१ व धामणगाव रेल्वे तालुक्यात ५५ ग्रामपंचायतींमध्ये मतदार यादीचा कार्यक्रम राहणार आहे.