महापालिका बॅकफुटवर : ‘सायबरटेकला ब्लॅकलिस्ट’ची नोटीसअमरावती : शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण अणि पुन:करनिर्धारणाचे काम थंडबस्त्यात असल्याने मनपाचे १०० कोटींच्या मालमत्ता करवसुलीचे स्वप्न भंगले आहे. याला कारणीभूत ठरणाऱ्या ‘सायबरटेक’ कंपनीला ‘ब्लॅकलिस्ट’संदर्भात नोटीस पाठविली आहे. भविष्यात ही कंपनी ‘ब्लॅकलिस्ट’ केल्यास पुन्हा एकदा सर्वेक्षण, कर निर्धारण रखडणार आहे. जनरल असेसमेंटसंदर्भात केलेला करारनामा रद्द करून कंपनीला काळ्या यादीत का टाकू नये, अशी नोटीस सायबरटेक सिस्टिम अँड सॉफ्टवेअर लि. ठाणे, कंपनीला पाठविण्यात आली असून २५ मार्चपर्यंत उत्तर देण्याची मुभा देण्यात आली आहे. ‘सायबर टेक’ला दिलेले जनरल असेसमेंट आणि सॉफ्टवेअरसंदर्भातील काम फेब्रुवारी २०१७ पर्यंत पूर्ण झाल्यावर मालमत्ताकराची मागणी १०० कोटी रूपयांवर जाणे अपेक्षित होते. त्याअनुषंगाने देयके वितरित करून सन २०१७-१८ आर्थिक वर्षात महापालिकेच्या उत्पन्नात वाढ अपेक्षित होती. मात्र, सायबरटेकने करारनाम्यानुसार ११ महिन्यात काम पूर्ण केले नाही. ते अद्यापही अंधारातच चाचपडत असल्याने असेसमेंट शून्य झाली आहे. सायबरटेकला सोपविलेले ‘जिओ-एनबल्ड प्रॉपर्टी टॅक्स सर्वे अँड इम्प्लिमेंटेशन आॅफ प्रॉपर्टी असेसमेंट सॉफ्टवेअर’चे काम पूर्ण न झाल्याने महापालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याकरिता शहरातील संपूर्ण मालमत्तांचे पुन:करनिर्धारण आवश्यक आहे. १२ वर्षांपासून करनिर्धारण झालेले नाही. याशिवाय ५० हजारांहून अधिक मालमत्ता कराच्या अखत्यारित नाहीत. त्याअनुषंगाने जनरल असेसमेंट सर्वे व सॉफ्टवेअर अंमलबजावणीचे कंत्राट ४ फेब्रुवारी २०१६ ला सायबरटेक कंपनीकडे सोपविण्यात आला. त्यासाठी २.६७ कोटींचा मोबदला ठरविण्यात आला. हे काम ११ महिने ७ दिवस अर्थात जानेवारी २०१७ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. तसे करारनाम्यात व कार्यारंभ आदेशात बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, मार्च उलटत असताना सायबरटेकने कुठलेही काम प्रत्यक्षात पूर्ण केले नाही. इतकेच नव्हे, तर कामाची प्रगती शून्य असताना सायबरटेकने कालमर्यादाही वाढवून मागितली नाही. त्यामुळे आपली ‘बँक गॅरंटी’ का गोठवू नये, अशी विचारणा उपायुक्त विनायक औगड यांनी सायबरटेकला केली आहे. (प्रतिनिधी)'एजन्सी'कडे मनुष्यबळाची वानवाजनरल असेसमेंट आणि सॉफ्टवेअरसंदर्भात काम करण्यासाठी सायबरटेककडून पुरेशा मनुष्यबळाचा वापर करण्यात आला नाही. एक पुरुष व एका स्त्री कर्मचाऱ्याच्या भरवशावर सायबरटेकने असेसमेंटचा भव्य डोलारा सांभाळण्याची कसरत केली. त्यामुळे वर्ष उलटूनही जनरल असेसमेंट व अनुषंगिक कामे शून्यच आहेत. वर्षभरात कंपनीकडून कुठलीही ठोस कामे करण्यात आली नाहीत, असा ठपका या कारणे दाखवा नोटीसमध्ये ठेवण्यात आला आहे. अटी-शर्तींचा भंगसायबरटेककडून करारनाम्यातील अटी-शर्तींचा भंग झाला आहे. तसेच कामाकरिता कालमर्यादा यापूर्वीच संपुष्टात आल्याने ‘सायबरटेक’च्या बँक गॅरंटीवर गंडांतर आले आहे. अट क्रमांक ९, २२ आणि अट क्रमांक १ चा भंग झाल्याने या कंपनीवर ब्लॅकलिस्ट होण्याची टांगती तलवार आहे.मालमत्तांचे सर्वेक्षण पुन:करनिर्धारणासंदर्भात सायबरटेकला नोटीस पाठविण्यात आली आहे. ब्लॅकलिस्टच्या कारवाईसह त्यांची बँक गॅरंटी जप्त करण्याच्या कारवाईची दिशा २५ मार्चनंतर ठरविण्यात येईल.- हेमंतकुमार पवार, आयुक्त
१०० कोटींचे स्वप्न भंगले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2017 12:12 AM