शहरातील अब्बासपुरा, सारायपुरा, सरमसपुरा, माळवेशपुरा, देवडी, जीवनपुरा या भागात १५ दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित स्वरूपाने होत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अचलपूर नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत अचलपूर शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी आहे. शहरात पाणीपुरवठा करण्याकरिता शासनाच्यावतीने आयएसएसडीपी व अमृत योजनेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून भरतीचे पाणी देण्यासाठी खर्च केले असताना अमृत योजनेतील गोंधळामुळे अचलपूर शहरातील बहुसंख्य भागात पाणी समस्या निर्माण झालेली आहे. एकीकडे कोरोनाने सर्वत्र थैमान घातले असताना अचलपुरात नागरिकांना कोरोनाशी सोबतच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची वेळ आलेली आहे. नगरपालिका कोणत्याही पर्यायी व्यवस्था करीत नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या संकटाला सामना करावा लागत आहे. एकीकडे उन्हाचे चटके बसत असताना पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा नागरिकांना कसरत करावी लागत आहे. अचलपूर नगरपालिका पाणीपुरवठा विभागाने या भागात पाण्याचे योग्य वितरण होत नाही त्या ठिकाणी व उन्हाळा पूर्वीच नियोजन करणे अपेक्षित होते. मात्र ते करण्यात दिरंगाई झाली असून, ९० लाखांच्या कामाचा तांत्रिक मंजुरी करतात पाठविलेला प्रस्ताव प्रलंबित असल्याने अडचणी येत असल्याचे प्रशासनातर्फे बोलल्या जात आहे.
अमृत योजनेचे काम निकृष्ट अमृत योजनेच्या पाईपलाईनचे काम अनेक भागात निकृष्ट झाल्याचा आरोप अनेक वेळा नगरसेवकांनी लावलेला आहे. अनेक भागांत अमृत योजनेच्यावतीने नवीन पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु, अनेक भागात जुनी पाईपलाईन सुद्धा त्याला जोडण्यात आली आहे. त्यामुळे जुनी पाईपलाईन मधून कनेक्शन देण्यात येत असताना पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत अचलपुरात इतर अनेक भागात पाण्याचा थेंब पोहचत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.