आरक्षणासाठी मारामार, टँकरने पाणीपुरवठा, वन्यप्राण्यांचा धोका, फलक लागले
लोकमत विशेष
नरेंद्र जावरे - चिखलदरा (अमरावती) : विदर्भातील नंदनवन चिखलदऱ्यात पावसाळ्यात हजारो पर्यटक दररोज हजेरी लावत आहेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व्हीव्हीआयपी विश्रामगृह आरक्षणासाठी सुटीच्या दिवसात रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे दोन महिन्यापासून येथे टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, हिंस्त्र प्राण्यापासून सावधानतेचा इशारा देणारे फलक परिसरात लागले आहे.
चिखलदरा पर्यटन स्थळावर इतर शासकीय विभागाच्या विश्रामगृहात सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह व्हीव्हीआयपी श्रेणीत ठेवले जाते. राज्यपाल, मुख्यमंत्री ते नेतेमंडळी सर्वोच्च दर्जाचे अधिकारी येथे मुक्काम करतात. त्यामुळे कायम रंगरंगोटी, बारीक-सारीक गोष्टींवर अधिकाऱ्यांनाही लक्ष द्यावे लागतात. इंग्रजकालीन हे सर्किट हाऊस ई स १८८२ मध्ये बांधण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात ते आहे. आरक्षण अचलपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयातून केले जातील. राज्यातील महत्त्वाची व्यक्ती सर्वोच्च अधिकारी व नेतेमंडळी यांचा मुक्कामी वावर असल्याने खुद्द कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहेत्रे यांना आरक्षणावर लक्ष द्यावे लागत आहे.
बॉक्स
मुक्कामासाठी पत्रांचा खच,
चिखलदऱ्याच्या सर्किट हाऊसवर मुक्काम करण्यासाठी खोल्यांचे आरक्षण मिळावे म्हणून सर्वोच्च अधिकारी तथा नेत्यांचे, पत्र, मिळविण्यासाठी कार्यकर्ते व संबंधितांची लगबग दिसून येते. आपणास खोलीचे आरक्षण मिळावे, यासाठी कार्यकर्त्यांची दमदाटी हा नेहमीचा भाग येथील कर्मचाऱ्यांना पाठ झाला आहे.
बॉक्स
पाणी संपले, ओरडू नका. टँकरने पुरवठा
चिखलदऱ्यात जानेवारी महिन्यापासून भीषण पाणीटंचाईचा सामना रहिवाशांना करावा लागत आहे. येथील सक्कर तलाव, साठवण तलाव लिकेज झाल्याने त्याचे काम सुरू आहे. परिणामी दिवसाआड शहराचा पाणीपुरवठा असला तरी अप्पर प्लेटो स्थित सर्किट हाऊसवर जूनपासून लॉकडाऊन शिथिल होताच टँकरने पाणीपुरवठा सुरू केला. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे फलक लावले आहे.
बॉक्स
वन्यप्राण्यापासून सावधान
चिखलदरा पर्यटन क्षेत्राला लागूनच व्याघ्र प्रकल्पाचा परिसर असल्याने व विश्रामगृह परिसरात बिबट, अस्वल, विषारी साप आढळून आले आहे. त्यामुळे आरक्षणासोबत वन्यजीव अधिनियमांतर्गत कायद्याचे पालन व रात्री बाहेर वावर करू नये, असा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला सर्किट हाऊस परिसरात लावावा लागला.
कोट
नियमानुसार आरक्षण दिले जात असले तरी पिण्याच्या पाण्यासह वापरण्याच्या पाण्याची कमतरता आहे. जून महिन्यापासूनच टँकरने पुरवठा होत आहे.
- विशाल लेंगरे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, चिखलदरा