अमरावती : राजापेठ पोलिसांनी एका कारमधून सुमारे ९६ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. ९ जानेवारी रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली. कारसह गुटखा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी कारचालक तुषार सुनिल नानवाणी (२१, रा. कंवर नगर) याला अटक करण्यात आली आहे.
एक इसम हा एमएच ३३ ए २५७१ या कारमधून प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतुक करत असून तो दस्तुर नगर ते फरशी स्टॉप रोडने पुढे जात असल्याची गोपनिय माहिती राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांना मिळाली. त्यानुसार, राजापेठ डीबी पथकाने सापळा रचत त्या वाहनाला थांबवून झडती घेतली असता, त्यात सुमारे ९६ हजार रुपये किमतीचा विविध कंपनीचा गुटखा माल आढळून आला. घटनास्थळाहून दोन लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली. तर, आरोपी तुषार नानवाणीविरुद्ध राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त विक्रम साळी, सहाय्यक पोलीस आयुक्त पुनम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मनिष ठाकरे, पोलीस उपनिरिक्षक काठेवाडे, अंमलदार मनिष करपे यांनी ही कारवाई केली.