झोपण्याची व्यवस्था नाही, डासांच्या त्रासात काढावी लागते रात्र
अमरावती : गावखेड्यापर्यंत प्रवासी वाहतुकीचे जाळे पसरविणाऱ्या एसटी महामंडळामुळे अजूनही ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था टिकून आहे. गावागावांत बसेस पोहचविणाऱ्या चालक-वाहकांना मात्र अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषत: गावांमध्ये मुक्कामी जाणाऱ्या चालक-वाहकांना बसमध्येच डासांच्या त्रासात रात्र काढावी लागत आहे.
कोरोनामुळे महामंडळाची प्रवासी सेवा कोलमडली. त्यानंतर हळूहळू प्रवासी वाहतूक रुळावर येत आहे. सद्यस्थितीत महामंडळाच्या ६०० पेक्षा अधिक फेऱ्या सुरू आहेत. यापैकी शहरी भागात लांब पल्ल्याच्या ठिकाणी ५१ आणि ग्रामीण भागात १४ अशा ६५ बसेस मुक्कामी जात आहेत.
बॉक्स
निवाऱ्याची व्यवस्था नाही
गावामधून पहिला टाईम पाठविण्यासाठी रात्री मुक्कामी असणारी बस गावातील चौकात किंवा गावाबाहेर सुनसान जागी उभी असते. या ठिकाणी मुक्कामी असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निवाऱ्याची सार्वजनिक व्यवस्था नाही. त्यामुळे एसटीचे कर्मचारी बसमध्येच मुक्काम करतात. त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बॉक्स
गावात सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे गैरसोय
अनेक गावांमध्ये सार्वजनिक शौचालये नाहीत. ज्या गावांमध्ये आहे, त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही. काही ठिखाणी शौचालयांची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे बसच्या चालक-वाहकांना रात्री उघड्यावर जावे लागत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
बॉक्स
कोरोनामुळे पूर्वीचे दिवस बदलले
राज्य परिवहन महामंडळाकडून अजूनही ग्रामीण भागातील गावांत मुक्कामी बसची सुविधा दिली जाते. लॉकडाऊनपूर्वी १५०० पेक्षा जास्त फेऱ्या सुरू होत्या. आता लाॅकडाऊननंतर प्रवासी वाहतूक रुळावर आल्याने ५० पेक्षाही कमी बसेस मुक्कामी आहेत. त्या बसवरील चालकांना पूर्वीप्रमाणे योग्य सहकार्य मिळत नसल्याची खंत काहींनी व्यक्त केली. पूर्वी चालक-वाहकांना गावकऱ्यांकडून मानसन्मान मिळत होता. त्यांच्या जेवणाची व्यवस्था होत होती. मात्र आता तशी परिस्थिती राहिली नाही.
बॉक्स
हातपंपावरून आणावे लागते पाणी
मुक्कामी असलेल्या बसच्या ठिकाणी सकाळी उठल्यानंतर प्रांतविधि व हात पाय धुण्यासाठी लागणारे पाणी गावातील हात पंपावरून आणण्याची व्यवस्था कर्मचाऱ्यांना भल्या पहाटे करावी लागत आहे. ही कसरत त्यांच्यासाठी नित्याचीच झालेली आहे.
बॉक्स
रात्री मुक्कामी जाणाऱ्या बसेस ६६
मुक्कामी थांबावे लागतात असे वाहक चालक
वाहक ६५
चालक ६५
कोट
ग्रामीण भागात मुक्कामी बसेसला अनेक वाहक आणि चालकांची नियुक्ती केली जाते. त्यांना सुविधा मिळण्यासाठी विभागीय कार्यालयाने परिपत्रक प्रसिद्ध केले. याची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीवर सोपविण्यात आली. मात्र, वाहकांना आणि चालकांना सुविधा मिळत नाही.
- बाळासाहेब राणे,
विभागीय सचिव एसटी कामगार सेना
कोट
मुक्कामी जाणाऱ्या बसच्या वाहक आणि चालकांना झोपण्यासाठी पुरेशा सुविधा मिळत नाही.बसमध्येच रात्र डासांसोबत काढावी लागते. ग्रामपंचायतीत सोय होत नाही. परिणामी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे.
- ज्ञानेश्वर खोंडचालक,
कोट
कोरोनाच्या काळात सेवा बजावत असल्याने आम्हालाही आमची काळजी घ्यावी लागते. मुक्कामी बस असलेल्या ठिकाणी ना पाणी मिळत, ना शौचालयाची सोय आहे. गावासोबतच बाहेर ठिकाणी मुक्कामी जाणाऱ्या काही विश्रामगृहातही फारशा सुविधा मिळत नाही. यात सुधारणा होणे आवश्यक आहे.
- स्वप्नील तायडे,
वाहक
कोट
ग्रामीण भागात आणि दुर्गम भागात काही प्रमणात चालक-वाहकांची गैरसोय होते. अशा ठिकाणी संबंधित ग्रामपंचायतीशी बोलून चालक-वाहकांची होत असलेली गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.
- श्रीकांत गभणे,
विभाग नियंत्रक