अमित कांडलकर
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: परतवाडा-भंडारा बसच्या मद्यपी चालक व वाहकाचा प्रतापामुळे महामार्गावर तब्बल ८५ किलोमीटरपर्यंत पन्नास प्रवाशांची प्राणाशी गाठ पडली होती. अखेर त्यांच्याच प्रवाशांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. रविवारी रात्री ७ वाजता ही घटना उघडकीस आली.भंडारा आगाराची एमएच ४० एक्यू ६४२१ क्रमांकाची बस परतवाड्याहून भंडारा येथे परतीच्या प्रवासाला निघाली होती. चालक सचिन चव्हाण (३४) व वाहक पांडे (५०) हे दोघेही दारू प्यायलेले होते. चालक अक्षरश: झिंगत असल्याचा धक्कादायक प्रकार प्रवाशांच्या निदर्शनास आला. त्यांनी वेळीच हा प्रकार लढा संघटनेचे संजय देशमुख यांना कळविला. त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले. तिवसा पोलिसांनी सदर बस मोझरी स्थानकावर थांबवून घेतली. तोपर्यंत बसने ८५ किलोमीटरचा प्रवास केला होता.तिवसा पोलिसांनी प्रवाशांना अन्य बसने पुढे पाठवले आणि चालक-वाहकांना ताब्यात घेऊन त्यांची रुग्णालयात तपासणी केली. यावेळी दोघांनी मोठ्या प्रमाणात मद्यपान केल्याचे आढळले. त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ अन्वये चालक सचिन चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल केला. वाहक पांडेविरुद्ध राज्य परिवहन महामंडळ कारवाई करणार असल्याचे तिवसा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तिरपुडे यांनी सांगितले.प्रवाशांचे प्रसंगावधानपरतवाडा-भंडारा बसमध्ये नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त होती. सुदैवाने रात्रीची वेळ आणि रविवार असल्याने महामार्गावर वर्दळ कमी होती. चालक-वाहक झिंगल्याचे लक्षात येताच मोझरी स्थानकात बस थांबवून प्रवाशांनी बस रोखून धरली.रविवारी प्रवास खरंच जीवघेणा होता. चालक व वाहक दोघांनीही मद्यपान केले होते. मध्येच चालक झिंगलेल्या अवस्थेला पोहोचत होता. ही बाब पाहून अखेर आम्ही बस मोझरी बस स्थानकावर थांबविली.- नितीन साबळे, प्रवासीमला बसमधील प्रवाशांनी भ्रमणध्वनीवर माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली. बस मोझरीत थांबवून पुढील अनर्थ टाळता आला, हे सुदैव.- संजय देशमुख, लढा संघटना प्रमुख.