लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : २४ बोगीतून प्रवास करीत असलेल्या हजारो प्रवाशांची तंद्री अचानक लागलेल्या एअरब्रेकने भंग केली. बर्थवरून अनेक प्रवासी खाली पडल्याने कुणाला अपघाताचा, तर कुणाला भूकंपाचा संशय होता. त्यातच इंजीनमधून निघत असलेला धुराचे लोट, इंंजंीनच्या कप्यात फसलेल्या चालकाने वाचविण्यासाठी मारलेली हाक व प्रवाशांचा आक्रोश असा थरार आणि जुळ्या गावांकडून मिळालेला माणुसकीचा ओलावाही प्रवाशांनी प्रत्यक्ष अनुभवला.हावडा-मुंबई मेलचे इंजीन धामणगावपासून आठ किलोमीटर अंतरावर जळाल्याने रेल्वेचा तांत्रिक विभाग समोर आला आहे़ धामणगाव, चांदूर रेल्वे या परिसरात घडलेली काही वर्षांतील दुसरी घटना आहे़ चांदूर रेल्वेनजीक अनेक वर्षांपूर्वी मालगाडीचे इंजीन पेटल्यामुळे चालकाने उडी घेतली अन् त्याचा मृत्यू झाला. रविवारी हावडा मेल धामणगाव स्थानकावर येण्यापूर्वी इंजीन जळाले. इंजीनलगत जनरल बोगी व पाठोपाठ एस-वन व इतर वातानुकूलित बोगी होत्या. या गाडीने अचानक ब्रेक मारल्याने अनेक प्रवाशांना काय घडले, याचा शोध लागला नाही. रेल्वे थांबताच प्रवाशांनी बाहेर पाहिले असता, इंजीनमधून धूर निघणे सुरू होते़ अनेकांनी बाहेर उड्या टाकल्या. महिला प्रवाशांनी एकच आक्रोश केला़चालकाची आर्त हाकरेल्वे इंजीन जळत असताना सहाय्यक चालक एस.के.विश्वकर्मा यांनी बाहेर उडी घेतली, तर मुख्य चालक धनराज ब्रम्हे हे इंजिनात अडकले. प्रवाशांनी प्रसंगवधान दाखवीत इंजीनचे काच दगड मारून फोडले आणि आत फसलेल्या मुख्य चालकाला बाहेर काढले़ पुढे असलेला मृत्यू आम्ही स्वत: अनुभवला. नशीब बलवत्तर म्हणून इंजीन मधील आग विझली, असे प्रवासी म्हणाले.प्रवाशांना मोफत आॅटो, थंड पाणीसन १९९२ मध्ये अहमदाबाद-हावडा या प्रवासी रेल्वे गाडीला येथेच अपघात झाला. हिंगणगाव-कासारखेड या गावाने माणुसकीचे दर्शन त्या काळात घडविले. रविवारी रेल्वे इंजीन जळल्याची घटना कानावर येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. धामणगावकडे पायी निघालेल्या प्रवाशांना युवकांनी आॅटोरिक्षातून मोफत आणले़ थंड पाण्याच्या बॉटल प्रवाशांना पुरविल्या.रेल्वे चालकाचे डोके भाजल्याने वेदना मोठ्या प्रमाणात होत होत्या. वेगाने दुचाकी दामटून घरून बर्फ आणला व ज्या ठिकाणी चालकाचे शरीर भाजले होते त्या ठिकाणी लावले. आम्हा ग्रामस्थांकरिता रेल्वे प्रवाशांच्या मदतीकरिता उभे राहण्याचा हा दुसरा प्रसंग आहे.- दुर्गाबक्षसिंह ठाकूर, उपसभापती, बाजार समिती, धामणगाव रेल्वे
चालकाची हाक अन् प्रवाशांमध्ये आक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 11:10 PM
२४ बोगीतून प्रवास करीत असलेल्या हजारो प्रवाशांची तंद्री अचानक लागलेल्या एअरब्रेकने भंग केली. बर्थवरून अनेक प्रवासी खाली पडल्याने कुणाला अपघाताचा, तर कुणाला भूकंपाचा संशय होता.
ठळक मुद्देजुळ्या गावांनी पुन्हा जपली माणुसकी : त्या घटनेने आणले अंगावर शहारे