सीईओ यांची आढावा बैठक : जलजीवन मिशनचे काम उत्कृष्ट
चांदूर रेल्वे : कित्येक वर्षे हक्काच्या मालमत्तेत राहूनसुद्धा त्या मालमत्तेचे शासकीय मोजमाप झाले नसल्याने त्याचा बँक कर्जासाठी किंवा मालमत्ता विक्री करताना व इतर कामात अनेक शासकीय अडचणींचा सामना ग्रामीण भागातील नागरिकांना करावा लागत होता. परंतु आता तालुक्यात लवकरच ड्रोन सर्वेक्षण होऊन प्रत्येकाला मालमत्ता कार्ड मिळणार आहे. याबाबत पंचायत समितीतर्फे सर्व तयारी झाल्याची माहिती गटविकास अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली.
२० जुलै रोजी दुपारी स्थानिक पंचायत समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली सर्व ग्रामसेवक तथा पंचायत समिती सर्व विभागप्रमुख यांचा योजनानुसार सविस्तर आढावा सभा पार पडली. त्यावेळी जलस्वराजचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी, पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मानकर उपस्थित होते.
यावेळी जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यात झालेल्या सर्व कार्याचा आढावा सीईओ यांनी घेतला. त्यात सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक सौचालय, नळ जोडणी, विषयी झालेल्या कामाविषयी समाधान व्यक्त केले. तालुक्यात सर्व कामात पुढे असल्याबाबत सीईओ यांनी पंचायत समितीचेही कौतुक केले. मालमत्ता कार्ड वाटपाविषयी आणि ड्रोन सर्वेक्षणाबाबतही प्रथमिक कार्यवाही पूर्ण झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. स्मार्ट अंगणवाडी करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी पंडा यांनी ग्रामपंचायत भिलटेक येथील सार्वजनिक शौचालयाची पाहणी केली. सोबतच घरकुल पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा केली. आढावा सभेला गटविकास अधिकारी एस. पी. थोरात, विस्तार अधिकारी पंचायत तथा सहायक गटविकास अधिकारी सुधाकर उमक, विस्तार अधिकारी पंचायत तथा नोडल अधिकारी चव्हाण, गटशिक्षणाधिकारी मुरलीधर राजनेकर तसेच सर्व विभागाचे विभागप्रमुख व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळ : भिलटेक, सावंगी संगम येथे पाहणी करताना सीईओ अविश्यांत पंडा व अन्य अधिकारी.