गजानन मोहोडअमरावती - सरासरीपेक्षा कमी पाऊस व तीन आठवड्याचा खंड यामुळे विदर्भातील 54 तालुक्यांना दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागू झाला आहे. त्यामध्ये नागपूर विभागातील 22, तर अमरावती विभागातील 31 तालुक्यांचा समावेश आहे. मात्र, दुष्काळाच्या दुसऱ्या ट्रिगरसाठी संबंधित तालुक्यांतील 10 गावे रँडम पद्धतीने निवडून विहित मापदंडानुसार सर्वेक्षण करावे लागणार आहे. कृषी आयुक्तांनी याविषयीचे निर्देश देऊन 21 ऑक्टोबरच्या आत अहवाल मागितला आहे.
शासनाने आता दुष्काळ घोषित करण्यासाठी 7 ऑक्टोबर 2017 च्या निकषाप्रमाणे नवी कार्यपद्धती निश्चित केली आहे. त्यानुसार खरिपाचा दुष्काळ 31 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. विदर्भातील 10 तालुक्यात सरासरीपेक्षा 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस आहे. या तालुक्यात रँडम पद्धतीने 10 गावे जिल्हाधिकारी निश्चित करतील व गावातील प्रमुख पिकांचा सर्व्हे/गट नंबर ठरविताना गावातील एकूण सर्व्हे व गट नंबरची संख्या विचारात घेतली जाणार आहे. या संख्येमधून रँडम पद्धतीने हा गट निवडण्यात येणार आहे. हे पीक एक हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर असल्याची खात्री करण्यात येणार आहे. या गटामधील पीक, शेतकऱ्यांची माहिती, पिकाची सद्यस्थिती, पिकांचे फोटो याविषयीची माहिती मोबाइल अॅपवर अपलोड करावी लागणार आहे. खरीप हंगामातील पिकांची कापणी करण्यापूर्वी अशाप्रकारे सर्वेक्षण करावे लागणार आहे. त्यानंतर ऑक्टोबरअखेर शासन खरिपाचा दुष्काळ जाहीर करणार आहे.