लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती / नांदगाव खंडेश्वर : मद्यपी पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिची हत्या केली. कौटुंबिक कलहातून ११ जानेवारी रोजी रात्री मंगरुळ चव्हाळा ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. छाया भूषण सुपलकार (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. भूषण भीमराव सुपलकार (४०) असे अटक आरोपीचे नाव आहे.
भूषण ने पत्नी छाया हिच्यासोबत शनिवारी रात्री ८ वाजता त्याने दारूच्या नशेत पत्नीशी वाद घातला. या वादात त्याने पत्नी छाया हिच्या गळ्यावर चाकूने वार केला. भूषणनेच रक्तबंबाळ स्थितीत पत्नी छाया हिला नांदगाव खंडेश्वर येथे व पुढे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
रविवारी घेतले ताब्यात या प्रकरणी मृत छाया हिचा भाऊ मनीष काटे (३७, रा. मंगरुळ चव्हाळा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पती भूषणविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला. त्याला पकडण्यासाठी पथकदेखील नेमले. आरोपी भूषणला रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली. त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मंगरूळ चव्हाळा येथील ठाणेदार राजीव हाके यांनी दिली.