अमरावती : मद्यधुंद कारचालकाने मार्गावरील दोन वाहनांना उडविल्याने पोलीस कर्मचाऱ्यासह एक महिला जखमी झाली. ही घटना गुरुवारी रात्री ८ ते ९ वाजताच्या सुमारास पोहरा मार्गावरील एसआरपीएफ कॅम्प परिसरात घडली. या अपघातात कारचालक हारूण अब्दूल खालीक (३३ रा. पोहराबंदी), पोलीस कर्मचारी लक्ष्मण उमाशंकर जोशी (५७,रा. पोलीस रिझर्व्ह लाईन) व शारदा निलेश खारोडे (२५,रा. दुर्गवाडा, तिवसा) जखमी झाले आहेत. पोहरा बंदी येथील रहिवासी अब्दुल हारूण अब्दूल खालीक हा चालक मद्यधुंद अवस्थेत कार एमएम-बीएक्स- ६९६८ घेऊन पोहराबंदीकडे जात होता. त्याच मार्गाने भोजराज दिलीप ठाकरे (२९,रा दुर्गवाडा, तिवसा) दुचाकीवर त्याची बहिणी शारदा खारोडे व दीड वर्षीय भाचा यांना घेऊन चांदूररेल्वेकडे जात होते. त्याच मार्गाने पोलीस कर्मचारी लक्ष्मण जोशीसुध्दा दुचाकीने जात होते. मात्र, रात्रीच्या ८ ते ९ वाजताच्या सुमारास एसआरपीएफ कॅम्पजवळ अब्दुल हारुण या कारचालकाने भरधाव कार चालवून दोघांच्याही दुचाकींना जबर धडक दिली. या अपघातात कारचालकासह पोलीस कर्मचारी व महिला जखमी झालेत. या घटनेची माहिती मिळताच फे्रजरपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. फे्रजरपुरा पोलिसांनी भोजराज दिलीप ठाकरे यांच्या तक्रारीवरून कारचालकाविरूध्द भादंविच्या कलम २७९, ३३७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एएसआय राठोड करीत आहेत. (प्रतिनिधी)
मद्यधुंद कारचालकाने दोन वाहनांना उडविले
By admin | Published: August 22, 2015 12:39 AM