चिखलदरा (अमरावती): विद्यार्थ्यांना व्हरांड्यात काढून शिक्षक वर्गखोलीत दारूच्या नशेत झोपत असल्याचा संतापजनक प्रकार मंगळवारी दुपारी १२ वाजता तालुक्यातील मांजरकापडी जिल्हा परिषद शाळेत गावक-यांनी उघडकीस आणला. या संतापजनक प्रकाराने मेळघाटातील शिक्षणाचा बट्ट्याबोळ पुन्हा पुढे झाला आहे. नामदेव मेश्राम असे शिक्षकाचे नाव आहे. मांजरकापडी येथे गत महिन्यात २७ तारखेला ते रुजू झाले. तालुक्यातील गौरखेडा बाजार ग्रामपंचायत अंतर्गत मांजरकापडी गावाचा समावेश आहे. येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. चार वर्गांमध्ये एकूण २९ विद्यार्थी आहेत. त्यासाठी दोन शिक्षक आहेत. गौरखेडा बाजार हे माजी आमदार केवलराम काळे, पंचायत समिती सभापती कविता काळे व जिल्हा परिषद सदस्य दयाराम काळे या आदिवासी नेत्यांचे गाव आहे. येथेच हा प्रकार असेल, तर इतर शाळांचे काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. सदर शिक्षक यापूर्वीसुद्धा मागील शाळेवर वादग्रस्त ठरल्याची माहिती आहे. शिक्षकावर कारवाईची मागणी पालकांनी केली आहे. —————-गावक-यांची धडक, शिक्षकाची अरेरावी शाळेच्या दुस-या दिवसापासूनच नामदेव मेश्राम वर्गात मद्यपान करून येत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यावरून पालकांनी पाळत ठेवली. मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास सरपंच सोनाली अल्केश महल्ले, पुनाय बेलसरे, शेवंती दारसिंबे, अल्केश महल्ले, उपसरपंच रामकिसन बेलसरे, मोतीलाल भासकर विलास बेलसरेसह ५०ते ६० आदिवासींनी शाळेवर धडक दिली. त्यांना विद्यार्थी व्हरांड्यात, तर शिक्षक नामदेव मेश्राम हे वर्गखोलीत झोपल्याचे आढळून आले. शिक्षकाला उठवून त्यांनी विचारले असता, आजारी असल्याचा आणि शासकीय कामात अडथळा केल्याचे गुन्हे तुमच्यावर दाखल करणार असल्याचा दम दिला. याबाबत बुधवारी सरपंच सोनाली अल्केश महल्ले यांनी गटशिक्षणाधिका-यांकडे तक्रार केली. —————-विद्यार्थ्यांना आणावा लागतो तंबाखू-चुनाशालेय सत्राच्या महिन्यापूर्वीच मांजरकापडी येथील जिल्हा परिषद शाळा वादग्रस्त ठरली. शिक्षक नामदेव मेश्राम हे विद्यार्थ्यांना तंबाखू-चुना आणायला लावत असल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला. ——————-झोपेचा नित्यक्रम वादग्रस्त शिक्षक नामदेव मेश्राम यांच्याकडे इयत्ता दुसरा आणि आणि चौथा वर्ग आहे. दररोज दुपारी १२ वाजता शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना व्हरांड्यात काढून ते स्वत: वर्गखोली झोप घेतात, असा आदिवासी पालकांचा आरोप आहे. ————-मांजरकापडी येथील शाळेच्या वर्गखोलीत मंगळवारी शिक्षक नामदेव मेश्राम दारू पिऊन झोपले होते. विद्यार्थी व्हरांड्यात आढळून आले. आम्हालाच त्यांनी गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. तशी तक्रार गटशिक्षणाधिका-यांकडे करण्यात आली आहे.- सोनाली अल्केश महल्ले, सरपंच, गौरखेडा बाजार—————- सदर प्रकार गंभीर आहे. शिक्षकाबद्दल तक्रार सरपंच व गावक-यांनी केली आहे. चौकशी करून कारवाईसाठी वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात येईल.- संदीप बोडखे, गटशिक्षणाधिकारी, चिखलदरा
दारूच्या नशेत गुरुजी झोपले वर्गखोलीत; विद्यार्थी व्हरांड्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 7:35 PM