आॅनलाईन लोकमतअमरावती : शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होऊन त्यांच्या शास्वत उत्पन्नात वाढ व्हावी, या उदात्त भावनेतून शासनाद्वारा पाच दिवसीय कृषी महोत्सवाची प्रत्येक जिल्ह्यात उपलब्धी करण्यात आली. अमरावती जिल्ह्याचा कृषी महोत्सव मात्र याला अपवाद ठरणारा आहे. कुठेच प्रचार, प्रसिद्धी नसल्याने या कृषी महोत्सवाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही. विशेष म्हणजे महोत्सवस्थळी आयोजनाच्या बहुतांश मानकांचे उल्लंघन होत असल्याने, याचा कितपत लाभ होईल, याविषयी शेतकरीच साशंक आहेत. केवळ अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी व शासन निधीच्या उधळपट्टीसाठी हा अट्टाहास आहे का, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणांतर्गत (आत्मा) अमरावती जिल्हा कृषी महोत्सव-२०१८ येथील सायंसकोर मैदानावर १७ ते २१ मार्चदरम्यान कृषी महोत्सव सुरू आहे.या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रगत कृषी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, प्रगतिशील शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ यांचे बहुमूल्य मार्गदर्शनाचा शेतकºयांना लाभ व्हावा, शेतमालास अधिक भाव मिळावा, यासाठी शेतकरी ते थेट ग्राहक, अशी विक्री शृंखला विकसित व्हावी. या माध्यमातून २०२० पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, हा या आयोजनामागील शासनाचा उद्देश आहे. मात्र, ई- निविदा प्रक्रियेपासूनच आयोजन यंत्रणेचा यामधील हस्तक्षेप व महोत्सव आयोजनाच्या बहुतांश मानकांचे समिती सदस्यांच्या उपस्थितीत खुलेआम उल्लंघन होत असल्याने या महोत्सवाचा आत्माच हरविला व याला व्यावसायिक स्वरूप आले असल्याची खंत शेतकºयांनी व्यक्त केली.या कृषी महोत्सवाची माहिती प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना व्हावी, यासाठी आयोजन समितीद्वारा प्रचार व प्रसिद्धीवर मोठा भर द्यावा, जेणेकरून शेतकऱ्यांची भरगच्च उपस्थिती होऊन त्यांना अधिकाधिक लाभ मिळेल, या विषयीच्या स्पष्ट शासनसूचना आहेत. मात्र, या महोत्सवासाठी माहिती विभागाच्या पत्रकाशिवाय कसलीच तयारी केलेली नाही. प्रत्येक तालुक्यासह जिल्हा मुख्यालयी बॅनर, पोस्टर, होर्ल्डिंग्ज लावल्याचे तसेच प्रसिद्धी पत्रके, हॅन्डविल गावागावांत मोठ्या प्रमाणावर वाटपासाठी शासनाच्या विशेष सूचना असताना असा कुठलाच प्रकार झाला नसल्याने किंबहुना यासाठी आयोजनाची मुख्य यंत्रणा असणारी ‘आत्मा’ विभागातील अधिकाऱ्यांनी याला अर्थपूर्ण बगल दिल्यानेच हा महोत्सव शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलाच नाही. शासनाची योजना कितीही चांगली असो, अंमलबजावणी करणारी यंत्रणाच जर तुंबड्या भरणारी असेल तर त्या-त्या योजनेचे कसे वाटोळे होते, याचे हे मूर्तिमंत उदाहरण येथील कृषी महोत्सव ठरणार आहे. यासंदर्भात ‘आत्मा’ प्रकल्प अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.आयोजनाच्या मानकांचे उल्लंघनमहोत्सवस्थळी महत्त्वाचे असणारे सुपर स्ट्रक्चरच्याऐवजी येथे डोम उभारण्यात आलेले आहेत. निविदेतील अटींचे हे सरळसरळ उल्लंघनच आहे.शहरामध्ये १० बाय २० फूट अकाराचे किमान ३० होर्डिंग्ज लावायला हवेत. मात्र, असे एकही होर्डिंग्ज उद्घाटनापर्यंत तरी लावण्यात आलेले नव्हते.स्थानिक केबलद्वारा किंवा स्थानिक इलेक्ट्रॉनिक्स चॅनलद्वारा अद्याप जाहिरात नाही. हॅडविल, पत्रक, घडीपुस्तिकांचे वाटप नाही. प्रचाररथही फिरकलेच नाही.अंमलबजावणी यंत्रणा ‘आत्मा’च्या अधिकाºयांना याची कल्पना असतानाही हा प्रकार होत असल्याने यामध्ये अर्थपूर्ण व्यवहाराचा आरोप केला जात आहे.
कृषी महोत्सवाला यंत्रणेचीच वाळवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 10:38 PM
शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होऊन त्यांच्या शास्वत उत्पन्नात वाढ व्हावी, या उदात्त भावनेतून शासनाद्वारा पाच दिवसीय कृषी महोत्सवाची प्रत्येक जिल्ह्यात उपलब्धी करण्यात आली.
ठळक मुद्देकशी होईल उद्दिष्टपूर्ती? : शेतकऱ्यांच्या नव्हे अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी उत्सव