जिल्हा परिषद :२७ जणांवर रंगीत तालीम फोटो मेलवर आहे
अमरावती : कोरोना लस प्रत्यक्ष उपलब्ध झाल्यानंतर गोंधळ उडू नये, याकरिता जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने ८ जानेवारी रोजी अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणाचा ड्राय रन घेण्यात आला. यावेळी २७ लाभार्थींवर लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात आला. लसीकरण कार्यक्रम राबविताना येणारे अडथळे शोधण्यासाठी आणि त्यावर पुढील उपाययोजना करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. अंजनगाव बारी प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी ९ वाजता या प्रक्रियेला प्रारंभ झाला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रेवती साबळे, डाॅ. विनोद करंजीकर, डाॅ. दिलीप चऱ्हाटे आणि आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चके व या ठिकाणी कार्यरत आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या ड्राय रन केंद्राला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी भेट देऊन तेथील कामकाजाची व उपाययोजनांची माहिती जाणून घेतली.
सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या ड्राय रनसाठी अगोदर ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. या नोंदणीनुसार दिलेल्या वेळेत लाभार्थींना स्वागत कक्षात प्रवेश देण्यात आला. या ठिकाणी यादीतील लाभार्थींच्या नावाची शहानिशा करून त्यांचे थर्मल स्क्रीनिंग व पल्स ऑक्सिमीटरने शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपाण्यात आले. कोविड किंवा त्याबाबतची लक्षणे नसल्याची प्राथमिक खातरजमा केल्यानंतर पुढील कक्षात बसविण्यात आले. कोविन ॲपवर त्याच्याकडे असलेल्या शासकीय ओळखपत्राच्या माध्यमातून ओळख पटवून आवश्यक माहिती डाऊनलोड करण्यात आली. त्यानंतर संबंधित व्यक्तीला लसीकरण कक्षात पाठविण्यात आले. येथे लसीकरणासाठी आवश्यक सोयी उपलब्ध होत्या. लस देण्याच्या रंगीत तालमीनंतर पु्न्हा ॲपवर लसीकरण झाल्याची नोंद घेण्यात आली. हीच माहिती राज्याच्या आरोग्य विभागाच्या ॲपवर देण्यात आली.