नरेंद्र जावरे
परतवाडा : यंदा पिकलेही चांगले. सहा लाखांचे दहा लाख होण्याची उमेद होती. पण, दोन-चार दिवस आभाळ भरून आले, वादळ वारा सुटला अन् गारपीट झाली. मग सहाचे पुरे तीनही हातात नाही आले. बोरगाव पेठ येथील गजानन हिरपूरकर या युवा शेतकऱ्याची ही व्यथा आह.े.
अमरावती परतवाडा या महामार्गावर अनेक शेतांपुढे शेतकरी स्वतः उत्पादित केलेले टरबूज, खरबूज दोन ते अडीच महिन्यांपासून विकत आहेत. मोठ्या प्रमाणात नफा असल्यामुळे शेतकरी या हंगामी पिकाकडे वळला आहे. मात्र, त्यांची व्यथा जाणून घेतली तेव्हा चवदार टरबुजाची बेचव कहाणी पुढे आली. परतवाडा अमरावती महामार्गावर खाजगी वाहने दिवस-रात्र धावतात. उन्हाळ्यातील नव्हाळी असलेले पाणीदार टरबूज, खरबूज आदींची मागणी प्रत्येकाच्या घरी असते. मात्र, इतर पिकांप्रमाणे याही पिकात शेतकरी यंदा निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकला. टरबूज, खरबूज या फळाचा दरवर्षी नफेदार वाटणारा प्रयोग अवकाळी पाऊस आणि गारपिटीने फसला. शेतकऱ्यांना लाखोंचे नुकसान करून गेला.
बॉक्स
गजानन हिरपूरकर यांनी सहा एकरांत टरबूज, खरबूजची पेरणी केली. प्रत्येकी एक लाख रुपये ड्रिप इरिगेशनसह खर्च आला. सहा लाखांचे किमान दहा लाख, अर्थात दोन महिन्यांतच चार लक्ष रुपयांचा नफा त्यांना अपेक्षित होता. शेतीही तशी बहरून आली होती. प्रचंड उत्पन्न होणार, अशी अपेक्षा असताना अचानक त्यावर विरजण पडले. शेवटची तोड केली तेव्हा तीन लाख हाती आले होते. त्यामुळे तीन लाख रुपयांचे नुकसान त्यांना झाले आहे.
बॉक्स
दहा आणि पंधरातच मागणी
ठोक व्यापारांना कमी दरात फळे विकून मिळेल ती रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, फळे लहान आकाराची होती. त्यामुळे दोन आठवड्यात परिपक्व झालेले फळे विकावी, असा विचार सुरू असतानाच निसर्गाने दगा दिला. आता ४० ते ५० रुपयांचे फळ दहा ते पंधरा रुपयांतच ग्राहक मागून मोकळे होत असल्याचे गजानन हिरपूरकर यांनी सांगितले.